Stock Market Today: देशांतर्गत शेअर बाजारात आठवड्यातील शेवटच्या ट्रेडिंग सेशनदरम्यान बाजार फ्लॅट सुरू झाला. सेन्सेक्स ८० अंकांनी वधारला होता आणि ८३,३३० च्या आसपास होता. निफ्टी ३० अंकांच्या वाढीसह २५,४३० च्या आसपास होता. बँक निफ्टी ८० अंकांनी वधारून ५६,८४० च्या आसपास होता. ऑटो आणि मेटल निर्देशांकात घसरण दिसून आली, रियल्टी निर्देशांकही किंचित घसरला. एनबीएफसी, आयटी, एफएमसीजी सारख्या शेअर्समध्ये तेजी होती.
कामकाजादरम्यान बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, श्रीराम फायनान्स, बीईएल, महिंद्रा अँड महिंद्रा या कंपन्यांचे शेअर्स निफ्टीवर सर्वाधिक वधारले. तर, ट्रेंट, टाटा स्टील, एसबीआय लाइफ, जेएसडब्ल्यू स्टील, अपोलो हॉस्पिटल, ग्रासिममध्ये घसरण झाली.
दरम्यान, आजही बाजारात घसरणीचे संकेत दिसत होते. सलग तीन दिवसांपासून बाजारात घसरण सुरू आहे. मात्र, व्यापार एका मर्यादेत होत आहे. जागतिक बाजारपेठेबद्दल बोलायचं झालं तर काल अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचं 'बिग ब्युटीफुल बिल' मंजूर करण्यात आलं. दरम्यान, नॅसडॅक आजवरच्या उच्चांकावर गेला, तर डाऊनं ३४४ अंकांची झेप घेतली.
आज सकाळी गिफ्ट निफ्टी १३ अंकांनी वधारून २५,५२२ च्या आसपास होता. डाऊ फ्युचर्स रेड झोनमध्ये होते. सलग चार दिवसांपासून एफआयआयची विक्री सुरू असल्यानं बाजारात सुस्ती आणि नफावसुली सुरू आहे. मात्र, डीआयआय सातत्यानं खरेदी करत आहेत.