चंद्रकांत दडस, वरिष्ठ उपसंपादक -
पारंपरिक सोने आणि चांदीच्या पलीकडे जाऊन, गुंतवणुकीच्या नव्या युगाकडे पाऊल टाकण्याची वेळ आता आली आहे. धनत्रयोदशी म्हटली की, सोन्याची खरेदी शुभ मानली जाते; मात्र यंदा ‘डिजिटल सोने’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिटकॉइनकडे गुंतवणूकदारांचा वाढता कल दिसून येतो आहे.
२०२५ च्या सुरुवातीला सुमारे ९४,००० रुपये किमतीवर असलेला बिटकॉइन ऑक्टोबरच्या प्रारंभी १,२४,००० या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. म्हणजेच अवघ्या काही महिन्यांत तब्बल ३१ टक्क्यांहून अधिक परतावा आहे.
मर्यादित पुरवठा, वाढती किंमत
बिटकॉइनची सर्वांत मोठी ताकद म्हणजे त्याचा मर्यादित पुरवठा. या दुर्मीळतेमुळे सोन्याप्रमाणेच त्याची किंमत वेळेनुसार वाढत जाते. त्यामुळे पारंपरिक गुंतवणुकीच्या चौकटीबाहेर जाऊन नव्या पिढीला हा एक ‘स्मार्ट ॲसेट’ म्हणून आकर्षित करत आहे.
गुंतवणुकीची सुलभ पद्धत
आज बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करणे अगदी सोपे झाले आहे. बिटकॉइनमध्ये तुम्ही अवघ्या १०० रुपयांपासूनच गुंतवणूक सुरू करू शकता, त्यामुळे ते नवशिक्यांसाठीही सहज उपलब्ध आहे. विविध क्रिप्टो इन्व्हेस्टमेंट ॲप्स आणि एक्सचेंजेसच्या माध्यमातून खाते उघडून शेअर बाजाराप्रमाणेच गुंतवणूक करता येते. अनेक प्लॅटफॉर्मवर एसआयपीची सुविधाही उपलब्ध आहे. धनत्रयोदशीला सोने खरेदी ही परंपरा असली तरी यंदा ‘डिजिटल सोने’ घेण्याचा विचार अधिक दूरदृष्टीचा ठरू शकतो. बिटकॉइन ही केवळ गुंतवणूक नाही, तर ती डिजिटल अर्थव्यवस्थेकडे नेणारी वाटचाल आहे.