कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना स्वतःशी जोडून ठेवण्यासाठी विविध प्रयत्न करत असतात. चीनमधील एका कंपनीनं तर आपल्या कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी एका एका जबरदस्त योजनेची घोषणा केली. ही कंपनी आपल्या १८ सर्वात जुन्या आणि विश्वासू कर्मचाऱ्यांना भेट म्हणून फ्लॅट्स देणार आहे. या फ्लॅट्सची किंमत १.३ कोटी ते १.५ कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, ही योजना 'झेजियांग गुओशेंग ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी' या कंपनीची असून, ही कंपनी ऑटोमोबाईलचे सुटे भाग बनवण्याचं काम करते.
झेजियांग गुओशेंग ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजीमध्ये ४५० पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात. २०२४ मध्ये कंपनीचे एकूण उत्पादन मूल्य ७० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे ५८० कोटी रुपये राहिलं आहे. दरम्यान, आता कंपनीनं पुढील तीन वर्षांत फ्लॅट भेट देण्याचं ठरवलंय. या अनोख्या हाऊसिंग इन्सेंटिव्हचा मुख्य उद्देश कंपनीतील कर्मचारी दीर्घकाळ टिकून राहावेत आणि उच्च दर्जाचे प्रतिभावान लोक कंपनीशी जोडले जावेत हा आहे.
सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
कोणासाठी आहे ही योजना
कंपनीचे जनरल मॅनेजर वांग जियायुआन यांनी माहिती दिली की, ही योजना विशेषतः दुसऱ्या शहरातून येऊन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आहे. टेक्निकल आणि मॅनेजमेंट कर्मचाऱ्यांना एक हक्काचं आणि कायमस्वरूपी निवासस्थान मिळावं अशी कंपनीची इच्छा आहे. वांग यांनी स्पष्ट केलं की, या वर्षी त्यांनी पाच फ्लॅट्स दिले आहेत आणि पुढील वर्षी आणखी आठ फ्लॅट्स दिले जातील. अशा प्रकारे तीन वर्षांत एकूण १८ फ्लॅट्स देण्याचं नियोजन आहे. उत्कृष्ट टॅलेंटला आकर्षित करणं आणि मुख्य मॅनेजमेंट टीमला टिकवून ठेवणं हा यामागचा थेट उद्देश आहे.
करारावर स्वाक्षरी करावी लागणार
या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना एका हाऊसिंग करारावर स्वाक्षरी करावी लागेल आणि कंपनीनं फ्लॅटचे नूतनीकरण केल्यानंतरच ते तिथे राहू शकतील. पाच वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर हे घर पूर्णपणे त्यांच्या मालकीचं होईल, मात्र कर्मचाऱ्यांना केवळ नूतनीकरणाचा खर्च स्वतः करावा लागेल. कंपनीने हे सर्व १८ फ्लॅट्स आधीच खरेदी केले आहेत. यंदा ज्या पाच जणांना फ्लॅट्स मिळाले, त्यापैकी दोन जण सुरुवातीच्या पदावरून प्रगती करत व्यवस्थापन स्तरापर्यंत पोहोचले होते. ही मोहीम कंपनीचा कार्यात्मक खर्च कमी करण्याच्या आणि गुणवत्ता सुधारण्याच्या मोठ्या प्रयत्नांचा एक भाग आहे.
किती मोठे आहेत फ्लॅट्स?
हे सर्व फ्लॅट कंपनीच्या इंडस्ट्रीयल एरियापासून फक्त ५ किलोमीटर अंतरावर आहेत. त्यांची साईज १०० ते १५० चौरस मीटर (अंदाजे १,०७६ ते १,६१५ चौरस फूट) पर्यंत आहेत. त्या भागातील सरासरी रीसेल फ्लॅटची किंमत प्रति चौरस मीटर ७,००० ते ८,५०० युआन (अंदाजे ८९,००० ते १ लाख रुपये) आहे. कंपनीत काम करणाऱ्या एका जोडप्यालाही या योजनेअंतर्गत फ्लॅट मिळाला. त्यांना १४४ चौरस मीटरचं (अंदाजे १,५५० चौरस फूट) घर मिळालं.
