SRF share price: शेअर बाजारात अशा अनेक कंपन्या लिस्टेड आहेत ज्यांनी एका दशकात गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवलंय. यापैकी एक कंपनी म्हणजे एसआरएफ लिमिटेड. या कंपनीचे शेअर्स २०१४ मध्ये ३० रुपयांच्या पातळीवर होते, जे आज ३००० रुपयांपेक्षा जास्त किमतीवर व्यवहार करत आहेत. सध्या शेअरची किंमत ३०४४ रुपये आहे. दरम्यान, शुक्रवारी हा शेअर मागील दिवसाच्या तुलनेत ३.३५ टक्क्यांनी घसरुन बंद झाला. आता कंपनीने मोठ्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे.
काय आहे कपनीची योजना?
केमिकल्स कंपनी एसआरएफ लिमिटेड त्यांच्या विस्तार योजनांचा भाग म्हणून गुजरातमध्ये कृषी-रसायन प्रकल्प आणि इंदूरमध्ये बीओपीपी फिल्म उत्पादन सुविधा उभारण्यासाठी सुमारे ७५० कोटी रुपये गुंतवणार आहे. कंपनीच्या संचालक मंडळानं २३ जुलै रोजी गुजरातमधील दहेज येथे २५० कोटी रुपये खर्चून कृषी रसायन उत्पादनासाठी एक प्रकल्प उभारण्यास मान्यता दिली. दहेज येथील या कारखान्यातून दरवर्षी १२,००० टन कृषी रसायनांची उत्पादनं तयार होतील. कंपनीनं स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या निवेदनात, हा प्रकल्प १८ महिन्यांत पूर्ण होणार असल्याचं म्हटलं.
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
संचालक मंडळानं इंदूरमध्ये बीओपीपी (बायएक्सियली ओरिएंटेड पॉलीप्रॉपिलीन) फिल्म उत्पादन प्रकल्प स्थापन करण्यासाठी ४९० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मान्यता दिली, ज्यामध्ये अत्याधुनिक १०.४ मीटर रुंदीची ब्रुकनर फिल्म लाइन आणि मेटालायझर असेल. हा प्रकल्प २४ महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
कंपनीबद्दल अधिक माहिती
गुरुग्रामस्थित एसआरएफ लिमिटेडचे विविध व्यवसाय आहेत, ज्यामध्ये फ्लोरोकेमिकल्स, स्पेशॅलिटी केमिकल्स, परफॉर्मन्स फिल्म्स आणि फॉइल्स, टेक्निकल टेक्सटाईल्स आणि कोटेड आणि लॅमिनेटेड फॅब्रिक्सचा समावेश आहे. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत कंपनीचा नफा ४३२.३२ कोटी रुपये होता, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत २५२.२२ कोटी रुपये होता. जून २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीचे ऑपरेटिंग उत्पन्न १० टक्क्यांनी वाढून ३,८१८.६२ कोटी रुपये झालं.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)