Smallest AI : नोकरी म्हटलं की, चांगली पदवी आणि आकर्षक सीव्ही शिवाय तुम्हाला मुलाखतीचा कॉलही येत नाही, असा सर्वसाधारण समज आहे. पण, तुम्हाला जर सांगितलं की, आता डिग्री किंवा सीव्हीशिवाय तुम्हाला गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळू शकते, तर विश्वास बसेल का? होय, हे खरं आहे! बंगळूरुस्थित एक स्टार्टअप कंपनी 'स्मॉलेस्ट एआय'ने भरतीसाठी एक वेगळाच मार्ग निवडला आहे. सहसा कंपन्या भरतीसाठी उमेदवारांकडून सीव्ही आणि पदवीची मागणी करतात, पण या कंपनीने थेट पदवीशिवाय नोकरी देण्याबद्दल घोषणा केली आहे.
संस्थापकाची व्हायरल पोस्ट आणि अनोखी ऑफर
कंपनीचे संस्थापक सुदर्शन कामथ यांनी सोशल मीडियावर एक अनोखी नोकरीची पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट 'फुल-स्टॅक टेक लीड' या पदासाठी आहे. या नोकरीमध्ये ६० लाख रुपये निश्चित पगार आणि ४० लाख रुपये कंपनीची इक्विटी मिळणार आहे, म्हणजे एकूण १ कोटींचे पॅकेज! हा बंगळूरुमध्ये लवचिक कामाच्या तासांसह पूर्णवेळ ऑफिस जॉब आहे.
सुदर्शन कामथ यांच्या या व्हायरल पोस्टमध्ये त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की, या नोकरीसाठी कोणत्याही सीव्हीची आवश्यकता नाही. उमेदवाराला फक्त दोन गोष्टी कराव्या लागतील.
- त्याची ओळख १०० शब्दांत लिहावी लागेल.
- त्याने आतापर्यंत केलेल्या सर्वोत्तम कामाची लिंक शेअर करावी लागेल.
यासोबतच त्यांनी पोस्टमध्ये काही मूलभूत कौशल्यांची माहिती देखील दिली आहे.
कोणती कौशल्ये आवश्यक आहेत?
व्हायरल पोस्टनुसार, कंपनी अशा उमेदवारांच्या शोधात आहे ज्यांना ४-५ वर्षांचा व्यावहारिक अनुभव आहे. ज्यांना Next.js, Python आणि React.js चे चांगले ज्ञान आहे. याशिवाय, ज्यांना नवीन उपक्रम सुरू करण्याचा आणि चांगली वाढ साध्य करण्याचा अनुभव आहे, अशा उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
या पोस्टवर लोकांची प्रतिक्रिया काय आहे?
ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे आणि ६०,००० हून अधिक लोकांनी ती पाहिली आहे. यावर जोरदार चर्चा सुरू आहे.
एका वापरकर्त्याने X (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले की, "जर तुम्ही ४-५ वर्षांचा अनुभव मागत असाल, तर तुम्ही खऱ्या अर्थाने प्रतिभावान लोकांना संधी देत नाही का?." यावर सुदर्शनने उत्तर दिले की, "हा फक्त एक सामान्य नियम आहे. खरी प्रतिभा अनुभवाच्या पलीकडे असते."
काही लोकांनी मात्र याला एक उत्तम संधी म्हटले आहे, कारण ही भरती प्रक्रिया कौशल्य आणि अनुभवावर लक्ष केंद्रित करते.
एका वापरकर्त्याने म्हटले की, "मला वाटते ही हायब्रिड नोकरी असती तर अधिक चांगले झाले असते."
अनेकांना असे वाटते की अशा अनोख्या भरतीमुळे ही पोस्ट व्हायरल झाली आहे आणि हा एक महत्त्वाचा बदल आहे.
Hiring a cracked full-stack lead at Smallest AI
— Sudarshan Kamath (@kamath_sutra) July 7, 2025
Salary CTC - 1 Cr
Salary Base - 60 LPA
Salary ESOPs - 40 LPA
Joining - Immediate
Location - Bangalore (Indiranagar)
Experience - 4-5 years minimum
Languages - Next JS, Python, React JS
Work from Office - 5 days a week (slightly…
वाचा - पतीला घटस्फोट देणाऱ्या सायना नेहवालकडे किती संपत्ती आहे? आकडा ऐकून थक्क व्हाल!
भविष्यातील भरतीचा हाच मार्ग आहे का?
भारतीय स्टार्टअप्स आता पदवींपेक्षा कौशल्यांना अधिक महत्त्व देत आहेत, हे यातून स्पष्ट होते. विशिष्ट पदवीशिवाय आपल्या प्रतिभेने आणि अनुभवाने यश मिळवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही एक मोठी संधी आहे. स्मॉलेस्ट एआयने यापूर्वी ज्युनियर डेव्हलपर्ससाठी ४० लाख रुपयांची नोकरीची ऑफर दिली होती, ज्यामध्ये कोणताही रिज्युम मागितला नव्हता. यावरून असे दिसून येते की, स्टार्टअप्समध्ये भरती प्रक्रिया सोपी करण्याचा आणि केवळ कौशल्यांना प्राधान्य देण्याचा ट्रेंड वाढत आहे. हा भविष्यातील भरतीचा नवा मार्ग असू शकतो.