SIP Investment Plan : आजकाल लवकर निवृत्त होण्याकडे लोकांचा कल वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत तुमच्याकडे निवृत्तीनंतर सुखी आयुष्य जगण्यासाठी मोठा फंड असणे आवश्यक आहे. आपल्या कष्टाचे पैसे सुरक्षित ठेवून त्यातून मोठी कमाई करण्याची योजना प्रत्येकजण शोधत असतो. जर तुम्ही सुद्धा चांगल्या गुंतवणूक पर्यायाच्या शोधात असाल, तर '१०:१२:३०' हे सूत्र तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. हे सूत्र SIP वर काम करते. त्याद्वारे तुम्ही सहजपणे ३ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी उभा करू शकता.
१०:१२:३० हे सूत्र काय आहे?
- पहिला १० (१०००० रुपये): याचा अर्थ तुम्हाला दरमहा १०,००० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
- दुसरा १२ (१२%): याचा अर्थ, तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर वर्षाला सरासरी १२ टक्के परतावा मिळेल असे गृहीत धरले आहे.
- तिसरा ३० (३० वर्षे): याचा अर्थ, तुम्हाला ही गुंतवणूक सलग ३० वर्षे चालू ठेवावी लागेल.
या सूत्राचा उपयोग करून, तुम्ही शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक करून एक मोठे आर्थिक उद्दिष्ट साध्य करू शकता.
३ कोटी रुपये कसे कमवायचे?
या सूत्राच्या मदतीने ३ कोटी रुपये कसे मिळतात, हे समजून घेऊया.
- समजा, तुम्ही वयाच्या ३० व्या वर्षापासून दरमहा १०,००० रुपयांची SIP सुरू केली आणि ही गुंतवणूक पुढील ३० वर्षे (वयाच्या ६० वर्षांपर्यंत) चालू ठेवली, तर तुम्हाला मिळणारा निधी खालीलप्रमाणे असेल.
- तुमची एकूण गुंतवणूक: १०,००० रुपये प्रति महिना × १२ महिने × ३० वर्षे = ३६,००,००० रुपये
- चक्रवाढ व्याजासह परतावा: २,७२,०९,७३२ रुपये
- एकूण संचित निधी: तुमची गुंतवणूक + व्याज = ३६,००,००० + २,७२,०९,७३२ = ३,०८,०९,७३२ रुपये
या गणनेवरून हे स्पष्ट होते की, चक्रवाढ व्याजामुळे तुमच्या गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. म्युच्युअल फंडमध्ये SIP द्वारे नियमित आणि दीर्घकाळासाठी गुंतवणूक केल्यास तुमचे आर्थिक उद्दिष्ट सहज साध्य होऊ शकते.
वाचा - पगारवाढीचा 'T' फॅक्टर! TOR म्हणजे काय? ज्याशिवाय ८ वा वेतन आयोग लागू होणार नाही, लगेच जाणून घ्या!
तुम्हीही तुमच्या निवृत्तीचे किंवा इतर मोठे आर्थिक लक्ष्य निश्चित करून या सूत्राचा वापर करू शकता.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)