नवी दिल्ली : बाजारातील कमकुवत संकेत, अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याने सोमवारी सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली. चांदीच्या दरात ९,००० रुपयांनी घसरण होऊन ती २,५६,५०० रुपये प्रति किलोवर आली, तर सोन्याच्या दरात २,९५० रुपयांनी घट होऊन ते १,६०,२५० प्रति १० ग्रॅमवर आले.
सराफा असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, चांदीच्या दरात ३.४ टक्क्यांची घसरण झाली. शुक्रवारी ती २,६५,५०० रुपये प्रति किलो होती. सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली असून, त्यात १.८१ टक्क्यांची घट झाली आहे.
तज्ज्ञ काय म्हणतात?
पश्चिम आशियातील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असून, त्याचा परिणाम गुंतवणुकीच्या प्रवाहावर झाला आहे. पुढील काही दिवसांमध्ये सोने-चांदीच्या दरात मोठी हालचाल होण्याची शक्यता कमी आहे. बाजाराचे लक्ष आता फेडरल ओपन मार्केट कमिटी बैठकीकडे आहे. त्यातून आर्थिक अंदाज आणि व्याजदर धोरणाबाबत संकेत मिळतील.
