Silver Price Explosion : गुंतवणूक विश्वात सध्या सोन्यापेक्षाही जास्त चर्चा आहे ती 'चांदी'ची. गेल्या नऊ महिन्यांत चांदीनेगुंतवणूकदारांना जो परतावा दिला आहे, त्याने सर्वांचेच डोळे दिपवले आहेत. एप्रिल २०२५ मध्ये सुमारे ९५,९१७ रुपये प्रति किलो असलेली चांदी आज २,८७,७०१ रुपयांच्या ऐतिहासिक स्तरावर पोहोचली आहे. ही दरवाढ केवळ सट्टेबाजी नसून त्यामागे ठोस जागतिक आणि औद्योगिक कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
९ महिन्यांत गुंतवणूकदारांची चांदी!
गेल्या नऊ महिन्यांत चांदीच्या किमतीत तब्बल २००% वाढ झाली आहे. शुक्रवारी एमसीएक्सवर चांदी २,८७,७०१ रुपये प्रति किलोवर बंद झाली. गेल्याच आठवड्यात चांदीने २,९२,९०० रुपयांचा टप्पा ओलांडून नवा विक्रम प्रस्थापित केला होता. ही दरवाढ चांदीची वाढती मागणी आणि मर्यादित पुरवठा याचेच संकेत आहे.
तज्ज्ञांचे अंदाजही ठरले फोल; आता ३ लाखांचे लक्ष्य
चांदीचा वेग पाहून मोठमोठ्या ब्रोकरेज फर्म्सना आपले जुने अंदाज बदलावे लागले आहेत. वर्षभरापूर्वी मोतीलाल ओसवाल यांनी चांदी १.१० लाख रुपयांपर्यंत जाईल असा अंदाज वर्तवला होता. मात्र, किंमत त्याच्या दुप्पट झाली आहे. आता त्यांनी आपले लक्ष्य वाढवून ३,००,००० रुपये केले असून, चांदी आता या टप्प्याच्या अगदी जवळ पोहोचली आहे.
वाचा - होम लोन घेताय? बँकेकडून १००% कर्ज का मिळत नाही? वाचा आरबीआयचे नियम
दरवाढीची प्रमुख ४ कारणे
- औद्योगिक मागणी : सौर ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहने आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात चांदीचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
- पुरवठ्याची टंचाई : खाणींमधून होणारे उत्पादन मागणीच्या तुलनेत कमी पडत आहे. पृष्ठभागावरील साठा वेगाने रिकामा होत आहे.
- केंद्रीय बँकांची खरेदी : जगभरातील मध्यवर्ती बँका सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदीची मोठी साठवणूक करत आहेत.
- भू-राजकीय तणाव : रशिया-युक्रेन आणि मध्यपूर्वेतील तणावामुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून मौल्यवान धातूंना पसंती देत आहेत.
