Silver Price today : सोन्याकडे गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित आणि चांगला परतावा देणारा पर्याय म्हणून आजही पाहिले जाते. गेल्या वर्षभरात सोन्याने शेअर मार्केटप्रमाणे बंपर परतावा दिला आहे. त्यामुळेच सोन्यातील गुंतवणूक दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मात्र, यात आता चांदी देखील मागे राहिलेली नाही. पांढऱ्या धातून यावर्षी आतापर्यंत सुमारे ११ टक्के परतावा दिला आहे. परताव्याच्या बाबतीत चांदीची कामगिरी पुढील दोन-तीन वर्षांत चांगली राहण्याची अपेक्षा आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
सोन्याला चांदी मागे टाकेल?
अलीकडच्या काळात चांदीने चांगला परतावा दिला आहे. पण, सोन्यापेक्षा चांदी अधिक अस्थिर असल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण या धातूचा वापर गुंतवणूक मालमत्ता म्हणून तसेच उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. पण सोन्यापेक्षा ते अधिक परवडणारे असल्याने छोट्या गुंतवणूकदारांना खरेदी करणे सोपे जाते.
शेअर मार्केटमध्येही चांदीचा दबदबा
“देशातील चांदीच्या फ्युचर्स किमतीत गेल्या वर्षी १७.५० टक्क्यांनी वाढ झाली असून हे १० वर्षांच्या सरासरी ९.५६ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. गेल्या २ वर्षात चांदीने दमदार कामगिरी दाखवली आहे. यावर्षीही त्यात आतापर्यंत ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या, चांदी जागतिक आर्थिक संकटाच्या काळात २५ एप्रिल २०११ रोजी सेट केलेल्या त्याच्या विक्रमी ५० प्रति डॉलर औंसपेक्षा सुमारे ३५ टक्क्यांनी खाली व्यापार करत आहे. बाजारातील वाढीची अपेक्षा करणाऱ्यांसाठी ही किंमत पातळी गुंतवणुकीसाठी प्रवेश बिंदूचे संकेत असू शकते.
चांदीमध्ये गुंतवणूक करण्याची संधी?
एक कमोडिटी म्हणून चांदी हा औद्योगिक धातू असल्याने अत्यंत अस्थिर आहे. अनिश्चित आर्थिक परिस्थितींमध्ये गुंतवणुकीच्या हेतूंसाठी देखील याचा विचार केला जातो. चांदी दीर्घकालीन चांगला फायदा होऊ शकतो. पुढील दोन-तीन वर्षांच्या दृष्टीकोनातून परताव्याच्या बाबतीत चांदी इतर मौल्यवान धातूंना मागे टाकेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे जास्त परतावा लक्षात घेता चांदीमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचा सौदा होऊ शकतो.
चांदीची किंमत का वाढतेय?
चांदीच्या किमतीत सातत्याने वाढ होण्यामागे अमेरिका कनेक्शन आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफ आणि इतर धोरणांमुळे अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यासोबत चांदीमध्येही गुंतवणूक वाढली आहे. औद्योगिक मागणी कायम राहिली असून २०२५ मध्ये यूएस प्रमुख व्याजदरात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा चांदीसारख्या सुरक्षित गुंतवणूक मालमत्तेकडेही कल वाढत आहे.