नागपूर : मौल्यवान धातूंच्या बाजारात गुरुवार, २३ रोजी मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. नागपुरात सोन्याने तेजीचा सूर लावत १,२३६ रुपयांची वाढ नोंदवली. दुसरीकडे चांदी ४,१२० रुपयांनी घसरली. गुरुवारी ३ टक्के जीएसटीसह २४ कॅरेट सोने १,२७,७२० रुपयांवर पोहोचले, तर किलो चांदीचे भाव १,५८,६२० रुपयांपर्यंत खाली आले.
सणासुदीच्या काळात ग्राहकांकडून वाढलेली मागणी आणि जागतिक बाजारातील सकारात्मक संकेत, यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली. सध्याच्या आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळत असल्याचे बाजार विश्लेषकांनी सांगितले. दरम्यान, औद्योगिक मागणीत घट आणि जागतिक बाजारातील मंदीच्या प्रभावामुळे चांदीचे दर कोसळले. औद्योगिक उत्पादनात घट आणि डॉलरच्या मजबुतीमुळे चांदीच्या किमतींवर दबाव कायम राहण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात सोन्याच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली.