जळगाव : चांदीच्या भावात वाढ सुरूच असून, शनिवारी एकाच दिवसात थेट १४ हजार ५०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी दोन लाख ४७ हजार रुपयांवर पोहोचली. सोन्याच्याही भावात एक हजार ४०० रुपयांची वाढ होऊन ते एक लाख ३९ हजार ७०० रुपयांवर पोहोचले.
चांदी २५ डिसेंबर रोजी एक दिवस स्थिर राहिली होती. मात्र त्यानंतर पुन्हा २६ व २७ डिसेंबरला मोठी वाढ नोंदविली गेली.
२६ रोजी १० हजार ५०० रुपयांची वाढ झाली आणि २७ रोजी पुन्हा १४ हजार ५०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी दोन लाख ४७ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली. जीएसटीसह आता चांदी दोन लाख ५४ हजार ४१० रुपयांवर पोहोचली आहे.
आठवडाभरात ४२,५००ची वाढ; पण तुटवडा कायम
गेल्या आठवड्याची तुलना पाहता आठवडाभरात चांदी ४२ हजार ५०० रुपयांनी वधारली आहे.एकीकडे चांदीचा तुटवडा व दुसरीकडे जागतिक पातळीवर मागणी वाढत असल्याने भावात वाढ होत असल्याचे व्यावसायिक सांगतात.
