प्रसाद गो. जोशी
गतसप्ताहात बाजारामध्ये चांगली वाढ झाली असून, भारतामधील कमी झालेला चलनवाढीचा दर, कंपन्यांच्या संमिश्र आलेले तिमाही निकाल आणि या वर्षामध्ये चांगला पाऊस होण्याचा अंदाज यामुळे बाजारामध्ये तेजी परतण्याची चिन्हे आहेत. गतसप्ताहामध्ये अमेरिकेच्या डॉलरचे मूल्य कमी झाले असल्याने परकीय वित्तसंस्थांनी भारतामध्ये चांगली खरेदी केली. या सप्ताहातही परकीय वित्तसंस्थांचा खरेदीकडेच कल राहण्याची चिन्हे आहेत. गतसप्ताहात सुट्ट्यांमुळे शेअर बाजारात कमी दिवस व्यवहार झाले तरी बाजारात चांगली वाढ झाली आहे.
यावर ठरणार बाजाराची दिशा
टॅरिफमुळे गुंतवणूकदारही सावध पवित्रा घेताना दिसत आहेत. कंपन्यांचे तिमाही निकालही जाहीर होत आहेत. कंपन्यांच्या निकालाप्रमाणे काही कंपन्यांच्या दरामध्ये वाढ अथवा घट होण्याची शक्यता आहे. या सप्ताहात अनेक महत्त्वाच्या कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर होणार आहेत. जगभरातील बाजारांमधील वातावरण, कंपन्यांचे निकाल, डॉलरची परिस्थिती आणि खनिज तेलाचे दर यावर बाजाराचे लक्ष असणार असून, त्यावरच बाजाराची वाटचाल अवलंबून आहे.
परकीय वित्तसंस्थांची आक्रमक खरेदी का?
भारतीय शेअर बाजारामध्ये परकीय वित्तसंस्थांनी गतसप्ताहात मोठ्या प्रमाणात खरेदी केलेली दिसून आली. या संस्थांनी भारतामध्ये ८,५०० कोटी रुपये गुंतविले आहे.
भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होत असून, त्यामध्ये चांगली वाढ होण्याचे संकेत मिळत असल्याने परकीय वित्तसंस्था भारतामध्ये खरेदीसाठी सरसावल्या आहेत. याआधी परकीय वित्तसंस्थांनी बराच काळ भारतीय शेअर्सची विक्री केल्यानंतर मग काहीकाळ थोडी खरेदीही केली होती. गतसप्ताहातील या खरेदीचा बाजारावर सकारात्मक परिणाम दिसून आला.