लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : २०२५च्या पहिल्या सहा महिन्यांतच म्युच्युअल फंडातील खात्रीचा गुंतवणूक पर्याय म्हणून पाहिल्या जाणाऱ्या तब्बल एक कोटी १२ लाख नेट एसआयपी-सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन बंद झाले आहेत. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये नकारात्मक नेट एसआयपी ट्रेंड निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे. याबाबत, यंदा नव्या एसआयपी नोंदींमध्ये घट होण्यात जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांनी अवलंबलेले सावध धोरण असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
पहिल्या ६ महिन्यांपैकी २ महिन्यांत नेट नव्या एसआयपींची नोंद झाली असून, उर्वरित चार महिन्यांत एसआयपी बंद झाल्या आहेत. नोमुरा या संस्थेच्या अहवालानुसार, जानेवारी महिन्यात नेट नव्या एसआयपींची नोंद बाहेर पडणाऱ्यांपेक्षा ५ लाखांनी कमी होती.
काय असतो एसआयपी स्टॉपेज रेशो?
म्हणजेच थांबलेल्या एसआयपींची नव्याने नोंदवलेल्या एसआयपींच्या तुलनेतील संख्या. हा रेशो १०० टक्क्यांच्या पुढे गेल्यास जास्त एसआयपी बंद होत असल्याचे दिसते.
यात कालावधी संपलेल्या एसआयपीही धरल्या जातात. शिवाय गुंतवणूकदारांनी आपल्या पोर्टफोलिओत फेरबदल करताना एखादी एसआयपी बंद करून दुसरी सुरू करणेही शक्य असते.
२०२५च्या पहिल्या सहा महिन्यांतच
एक कोटी १२ लाख एसआयपी बंद
वर्षाच्या केवळ दोन महिन्यांत नेट
नव्या एसआयपींची झाली नोंद
उर्वरित ४ महिन्यांत सर्वाधिक एसआयपी झाल्या बंद
एप्रिलमध्ये सर्वाधिक प्रमाण
फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलमध्ये अनुक्रमे १० लाख, ११ लाख आणि जवळपास एक कोटी १६ लाख एसआयपी बंद झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.
एप्रिलमध्ये सर्वाधिक एसआयपी स्टाॅपेज रेशाे
म्युच्युअल फंड असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एएमएफआय) आकडेवारीनुसार, जून महिन्यात म्युच्युअल फंड एसआयपी स्टॉपेज रेशो ७७.७७ टक्के इतका नोंदवण्यात आला. हा रेशो मे महिन्यात ७२.१२ टक्के व जून २०२४ मध्ये ५८.६८ टक्के होता.
याचा अर्थ नव्या एसआयपींची नोंद वाढली असली तरी थांबलेल्या किंवा कालावधी संपलेल्या एसआयपींची संख्यादेखील वाढली आहे. एप्रिलमध्ये स्टॉपेज रेशो तब्बल २९७ टक्के इतका होता.
कारण, त्या काळात एक कोटी ३६ लाख ९९ हजार एसआयपी बंद झाल्या तर त्याच काळात ४६.०१ लाख नव्या एसआयपींची नोंदणी झाली. तर जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये स्टॉपेज रेशो अनुक्रमे १०९ टक्के, १२२ टक्के आणि १२८ टक्के इतका होता.