बिझनेस रिअॅलिटी शो 'शार्क टँक इंडिया'चा ५ वा सीझन ५ जानेवारीपासून सुरू झाला आहे. नवीन आणि जुन्या उद्योजकांमध्ये हा शो अत्यंत लोकप्रिय आहे. यावेळी शोमध्ये ६ नवीन शार्क्ससह एकूण १५ शार्क्स दिसणार आहेत. या नवीन शार्क्समध्ये कनिका टेकरीवाल (Kanika Tekriwal) यांचाही समावेश आहे. कनिका यांची गणना अशा महिला उद्योजकांमध्ये केली जाते ज्यांनी कठोर परिश्रमाच्या जोरावर मोठे स्थान मिळवलं आहे. त्यांनी भारतातील खाजगी विमान वाहतुकीसाठी (Private Aviation) पहिली बाजारपेठ (Marketplace) तयार केली आणि आता त्या 'शार्क टँक इंडिया'चा भाग बनल्या आहेत.
कनिका टेकरीवाल यांची एकूण संपत्ती आज ४२० कोटी रुपयांहून अधिक आहे. हुरुन रिच लिस्टमध्ये (Hurun Rich List) सर्वात तरुण श्रीमंत महिलांपैकी त्या एक आहेत. कनिका टेकरीवाल या 'जेटसेटगो' (JetSetGo) या एव्हिएशन कंपनीच्या संस्थापिका आहेत. त्यांच्या कंपनीच्या ताफ्यात नऊ खाजगी जेट आणि दोन हेलिकॉप्टर आहेत, जे त्या भाड्यानं देतात. त्यांच्या कंपनीनं आतापर्यंत १,००,००० हून अधिक प्रवाशांना सेवा दिली असून ६,००० हून अधिक फ्लाईट्स चालवल्या आहेत.
२१ व्या वर्षी व्यवसायाची सुरुवात
कनिका यांनी वयाच्या २१ व्या वर्षी एका साध्या पण क्रांतिकारी कल्पनेनं आपल्या कंपनीची सुरुवात केली. त्यांना खाजगी विमान वाहतुकीसाठी 'उबर (Uber) सारखे मॉडेल' तयार करायचं होतं. जेट खरेदी करणं आणि ते भाड्यानं देणं, जेणेकरून भारतातील खाजगी विमान प्रवास अधिक सोपा, पारदर्शक आणि सुव्यवस्थित होईल, असा त्यांचा आराखडा होता. एका मुलाखतीत कनिका यांनी सुरुवातीच्या संघर्षाबद्दल सांगितल, "जेव्हा मी माझा व्यवसाय सुरू केला, तेव्हा कोणालाच काही समजलं नाही. माझ्यात एक 'धोकादायक कॉम्बिनेशन' होते - मी एक मुलगी होते, फक्त २१ वर्षांची होते आणि अशा उद्योगात होते जिथे पुरुषांचे वर्चस्व होतं."
भांडवल उभं करताना आल्या अडचणी
कंपनीसाठी पैसे उभे करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचं कनिका यांनी सांगितलं. गुंतवणूकदारांनी त्यांचे दरवाजे लवकरच बंद केले होते. जेव्हा त्या फंडिंगसाठी गेल्या, तेव्हा त्यांना बाजाराच्या आकाराबद्दल विचारण्यात आले. प्रत्येक गुंतवणूकदारानं नकार दिला, मात्र फक्त एका व्यक्तीनं त्यांच्यावर विश्वास दाखवला.
केवळ ५६०० रुपयांची गुंतवणूक
भूतकाळाकडे पाहताना कनिका यांना वाटते की हे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरले. त्या म्हणतात, "अनेक लोक मला विचारतात की मी फंडिंग न घेता हे कसं केलं. आजपर्यंत मी व्यवसायात फक्त ५६०० रुपये गुंतवले आहेत आणि आम्ही भारतातील सर्वात मोठ्या खाजगी जेट ताफ्याचे संचालन करतो." वयाच्या २१ व्या वर्षी केलेली ५,६०० रुपयांची ही गुंतवणूक आता शिस्त आणि चिकाटीच्या जोरावर ४२० कोटी रुपयांच्या साम्राज्यात बदलली आहे.
कंपनी नेमकं काय काम करते?
आज कनिका यांची एव्हिएशन फर्म फक्त चार्टर फ्लाईट्सपुरती मर्यादित नाही. त्यांची कंपनी एअरक्राफ्ट मॅनेजमेंट, मालकी हक्काबाबत सल्ला आणि एक्सक्लुझिव्ह मेंबरशिप प्रदान करते. तसंच, कंपनी विमान वाहतुकीच्या भविष्यातील तंत्रज्ञानावर, विशेषतः इलेक्ट्रिक आणि व्हर्टिकल टेक-ऑफ एअरक्राफ्टवर काम करत आहे.
