Share Market Today: सलग तीन दिवसांच्या जोरदार तेजीनंतर देशांतर्गत शेअर बाजारात गुरुवारी सुस्ती दिसून आली. सुरुवातीच्या व्यवहारात गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आणि आयटी (IT) व खासगी बँकिंग (Private Banking) शेअर्समधील विक्रीमुळे बाजाराची गती मंदावली. निफ्टी ५० आणि सेन्सेक्स दोन्हीही किंचित घसरणीसह उघडले, ज्यामुळे सातत्यानं सुरू असलेल्या तेजीला ब्रेक लागला.
सकाळी ९:१५ वाजेपर्यंत सेन्सेक्स ९४.४३ अंकांनी घसरून ८४,३७२.०८ वर होता, तर निफ्टी ३१.८० अंकांनी कोसळून २५,८४४.०० च्या पातळीवर व्यवहार करत होता. बाजारात क्षेत्रीय कल संमिश्र राहिले. मेटल क्षेत्रात मजबुती दिसली, पण आयटी आणि खासगी बँकिंग शेअर्सनं बाजाराला खाली खेचलं.
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
आयटी इंडेक्समध्ये ०.३४% ची घसरण नोंदवली गेली. निफ्टी प्रायव्हेट बँक इंडेक्स १.१७% नं कोसळला, ज्यामुळे बाजाराची एकूण भावना कमजोर झाली. याउलट, निफ्टी मेटल इंडेक्सने ०.९१% च्या वाढीसह आघाडी घेतली. मीडिया इंडेक्सनेही ०.४३% ची मजबुती दाखवली. ऑटो, ऑईल अँड गॅस आणि कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रांमध्ये किरकोळ घसरण दिसून आली.
इतर क्षेत्रांमध्ये सुस्ती
निफ्टी बँक, एनर्जी, एफएमसीजी, इन्फ्रा, फार्मा, पीएसयू बँक आणि रियल्टी इंडेक्समध्ये कोणतीही खास हालचाल दिसली नाही आणि हे जवळपास फ्लॅट व्यवहार करत राहिले. दरम्यान, इंडिया VIX ३% ने घसरून ११.७५ वर पोहोचला, जो सध्या बाजारात कोणतीही भीती नसल्याचं दर्शवतो.
किरकोळ महागाईत घट, व्याजदर कपातीची आशा
ऑक्टोबर महिन्यात देशातील किरकोळ महागाई दर कमी होऊन फक्त ०.२५% वर आला आहे, जो २०१३ मध्ये ही मालिका सुरू झाल्यापासूनची सर्वात नीचांकी पातळी आहे. तज्ज्ञांचं मत आहे की, महागाईतील ही घट आरबीआयच्या डिसेंबर बैठकीत व्याजदरांमध्ये आणखी एक कपात होण्याची अपेक्षा मजबूत करते.
