- प्रसाद गो. जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरोनाच्या रुग्णांची कमी होणारी संख्या, वाढते लसीकरण, कमी होत असलेल्या निर्बंधांमुळे अर्थव्यवस्था गती घेण्याची शक्यता यामुळे गतसप्ताहात शेअर बाजार चांगला वाढला. सलग चौथ्या सप्ताहामध्ये निर्देशांक वाढीव पातळीवर बंद झाले.
बाजारात झालेल्या जोरदार खरेदीमुळे सेन्सेक्स, निफ्टी तसेच स्मॉलकॅप या निर्देशांकांनी नवीन उच्चांकांची नोंद केली आहे. आगामी सप्ताहामध्ये जाहीर होणारी भारतीय अर्थव्यवस्थेबाबतची आकडेवारी तसेच अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हची होणारी बैठक याकडे बाजाराचे लक्ष लागले आहे.
कोरोनाकाळामध्ये सेन्सेक्सचे विक्रम
n कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला मोठे हादरे बसत असले तरी मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाने चालू वर्षामध्ये अनेक नवीन विक्रम नोंदविले आहेत. २१ जानेवारी रोजी या निर्देशांकाने प्रथमच ५० हजारांच्या जादुई आकड्याला स्पर्श केला.
n ३ फेब्रुवारी रोजी निर्देशांक ५० हजारांच्यावर बंद झाला. ५ फेब्रुवारी रोजी निर्देशांकाने ५१ हजारांचा टप्पा ओलांडला, तर त्यानंतर तीन दिवसांनी म्हणजे ८ फेब्रुवारी तो ५१ हजारांच्या पुढे बंद झाला. १५ फेब्रुवारी रोजी सेन्सेक्सने ५२ हजारांचा टप्पा गाठला आहे. २४ मे रोजी मुंबई शेअर बाजारातील कंपन्यांच्या बाजार भांडवल मूल्याने ३००० अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला.
n परकीय वित्त संस्था पुन्हा एकदा भारतीय बाजारामध्ये सक्रियपणे खरेदी करीत आहेत. जून महिन्याच्या पहिल्या १० दिवसांमध्ये या संस्थांनी ४७८८ कोटी रुपयांची खरेदी केली आहे.
गतसप्ताहातील स्थिती
निर्देशांक बंद मूल्य बदल
सेन्सेक्स ५२,४७४.७६ ३७४.७१
निफ्टी १५,७९९.३५ १२९.१०
मिडकॅप २२,९२७.८३ ४१६.३४
स्मॉलकॅप २५,११६.३० ८५४.७०