Middle East Crisis Impact on Share Market: मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. या तणावामुळे कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली असून, त्याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली असून सेन्सेक्समधील टॉप-१० कंपन्यांच्या एकत्रित मार्केट कॅपमध्ये सुमारे ४.४८ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.
सेन्सेक्स-निफ्टीत मोठी घसरण
मध्यपूर्वेतील तणाव, कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती आणि जागतिक बाजारातील अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे भारतीय शेअर बाजारातही जवळपास प्रत्येक दिवशी घसरण दिसून आली. गेल्या आठवड्यातील पाच व्यापार सत्रांमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स ४,३५५ अंकांनी (५.५१%) घसरला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी १,२९९.३५ अंकांनी (५.३१%) घसरला.
गुंतवणूकदारांचे हजारो कोटींचे नुकसान
अहवालानुसार, सेन्सेक्समधील टॉप-१० कंपन्यांचे एकत्रित मार्केट कॅप केवळ एका आठवड्यात ४.४८ लाख कोटी रुपयांनी कमी झाले. यामध्ये सर्वाधिक फटका स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि एचडीएफसी बँक या बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांना बसला.
SBI गुंतवणूकदारांना मोठा फटका
गेल्या आठवड्यात SBI च्या मार्केट कॅपमध्ये मोठी घट झाली. कंपनीचे मार्केट कॅप ९.६६ लाख कोटी रुपयांवर आले, तर गुंतवणूकदारांना सुमारे ८९,३०६.२२ कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. तर, HDFC Bank च्या गुंतवणूकदारांना ६१,७१५.३२ कोटी रुपयांचा तोटा झाला अन् कंपनीचे मार्केट कॅपदेखील १२.५७ लाख कोटी रुपयांवर घसरले.
TCS, बजाज फायनान्स आणि एअरटेललाही फटका
इतर मोठ्या कंपन्यांनाही या घसरणीचा फटका बसला.
बजाज फायनान्स - मार्केट कॅप ५९,०८२.४९ कोटी रुपयांनी घटून ५.३२ लाख कोटींवर आले.
TCS - ५३,३१२.१२ कोटी रुपयांची घट, मार्केट कॅप ८.७२ लाख कोटींवर.
ICICI Bank - ४२,२०५.०४ कोटी रुपयांची घट, मार्केट कॅप ८.९७ लाख कोटींवर.
भारती एअरटेल - ३८,६८८ कोटी रुपयांची घट, मार्केट कॅप १०.२८ लाख कोटींवर.
रिलायन्स, LIC आणि इन्फोसिसमध्येही घसरण
देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजलाही या घसरणीचा परिणाम जाणवला. कंपनीचे मार्केट कॅप १८.६८ लाख कोटी रुपयांवर आले आणि गुंतवणूकदारांना ३३,२८९.८८ कोटी रुपयांचे नुकसान झाले. मोठ्या प्रमाणावर घसरण होऊनही मार्केट कॅपच्या दृष्टीने रिलायन्स इंडस्ट्रीज देशातील सर्वात मोठी कंपनी राहिली आहे.
(विशेष सूचना- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
