लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : भारतीय शेअर बाजारांनी विक्रम संवत २०८१ चा शेवट सोमवारी जोरदार वाढीने केला. रिलायन्स इंडस्ट्रीजसह मोठ्या कंपन्यांमधील खरेदी आणि परदेशी संस्थांच्या सततच्या गुंतवणुकीमुळे सेन्सेक्स व निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढले.
मुंबई शेअर बाजाराचा बीएसई सेन्सेक्स ४११.१८ अंकांनी (०.४९%) वाढून ८४,३६३.३७ अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा एनएसई निफ्टी १३३.३० अंकांनी (०.५२%) वाढून २५,८४३.१५ अंकावर पोहोचला. या सत्रात सेन्सेक्सने एका क्षणी ८४,६५६ पर्यंत झेप घेतली होती. आशियाई बाजारांत जपान, दक्षिण कोरिया, चीन आणि हाँगकाँगचे निर्देशांक वाढीसह बंद झाले.
स्वदेशी संस्थांची जोरदार खरेदी
त्या आधी शुक्रवारी परदेशी गुंतवणूकदार संस्थांनी ३०८.९८ कोटी रुपयांची, तर देशांतर्गत गुंतवणूकदार संस्थांनी १,५२६.६१ कोटी रुपयांची खरेदी केली.
आज दुपारी होणार मुहूर्ताचे सौदे
शेअर बाजार २१ आणि २२ ऑक्टोबर रोजी बंद राहील. मात्र, दिवाळीच्या मुहूर्तावर २१ ऑक्टोबर रोजी दुपारी १:४५ ते २:४५ दरम्यान विशेष ‘मुहूर्त ट्रेडिंग’ सत्र होईल.
विक्रम संवतमध्ये निर्देशांकांत ६ टक्के वाढ
संवत २०८१ मध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही सुमारे ६ टक्क्यांनी वाढले. निफ्टी बँक प्रथमच ५८,००० पार करत, ५८,२६१.५५च्या नव्या उच्चांकावर पोहोचला.
कोणत्या कंपन्यांच्या शेअर्सना झाला फायदा?
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये ३.५२ टक्के वाढ झाली. कंपनीचा सप्टेंबर तिमाहीतील नफा ९.६ टक्क्यांनी वाढल्यामुळे या शेअरला बळ मिळाले. बजाज फिनसर्व्ह, ॲक्सिस बँक, एसबीआय, टीसीएस, टायटन आणि भारती एअरटेल यांचे शेअर्सही वाढले.