Share Market Fraud : शेअर मार्केटमध्ये पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळत आहे. गेल्या ५ महिन्यांपासून बाजारात सातत्याने घसरण झाल्यानंतर सेन्सेक्समध्ये ११०० अंकांनी वाढ झाली आहे. यामुळे गुंतवणूकदार बाजाराकडे आकर्षित होत आहे. तुम्हीही या संधीचा फायदा घेण्याचा विचार करत असाल तर सावध व्हा. कारण, शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणुकीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशाच प्रकारची घटना आता नोएडामधून समोर आली आहे, ज्यात शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली एका व्यावसायिकाची १.१५ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
शेअर बाजारात नफ्याचे आमिष
मीडिया रिपोर्ट्सनुसार, २७ जानेवारी रोजी नोएडाच्या सेक्टर ४४ मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला ऋषिता नावाच्या महिलेचा फोन आला. महिले शेअर बाजारात जास्त नफा मिळवणून देण्याचे आमिष दाखवते. त्यानंतर पीडित व्यक्तीला catalystgroupstar.com आणि pe.catamarketss.com द्वारे गुंतवणूक करण्यास सांगितले. दोन्ही लिंक्सने त्यांना m.catamarketss.com या दुसऱ्या पोर्टलवर रीडायरेक्ट केले.
नफा दिसत असल्याने सातत्याने गुंतवणूक
पीडित व्यक्तीने सुरुवातीला ३१ जानेवारी रोजी बहिणीच्या खात्यातून १ लाख रुपये गुंतवले. एका दिवसानंतर त्याला १५,०४० रुपये नफा झाल्याची माहिती मिळाली. त्याने हे पैसे काढून घेतले. पैसा थेट हातात आल्याने त्यांचा या योजनेवरील विश्वास आणखी वाढला आहे. या नफ्याने ते इतके खूश झाले की फेब्रुवारीपर्यंत सतत या योजनेत गुंतवणूक करत राहिले. ऋषिताने दिलेल्या सूचनेनुसार त्यांनी एकूण ६५ लाख रुपये वेगवेगळ्या खात्यांमध्ये गुंतवले. त्यांची गुंतवणूक १.९ कोटी रुपयांपर्यंत वाढल्याचे आश्वासन त्यांना देण्यात आले.
प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या बहाण्याने पैशांची मागणी
हे पैसे काढण्यासाठी त्यांना प्रथम ३१.६ लाख रुपये कर भरण्यास सांगण्यात आले. हे पैसेही त्यांनी मार्चच्या सुरुवातीला जमा केले. यानंतर, फसवणूक करणाऱ्यांनी २४ तासांच्या आत निधी देण्याच्या नावाखाली 'कन्व्हर्जन चार्ज' म्हणून १८.६ लाख रुपयांची वेगळी मागणी केली. लवकर पैसे मिळतील या आशेने पीडित व्यक्तीने तीही रक्कम तात्काळ भरली. मात्र, त्यानंतरही ना नफ्याचे पैसे मिळाले, ना गुंतवलेली मुद्दल. त्याऐवजी फसवणूक करणाऱ्यांनी त्याच्याकडे आणखी ४० लाख रुपये मागितले. यानंतर आपली फसणवूक होत असल्याचे पीडित व्यक्तीच्या लक्षात आले.
पुढील तपास सुरू
यानंतर, एक मिनिटही वाया न घालवता त्यांनी नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो आणि सायबर क्राइम पोलिसांकडे तक्रार दाखल केली. भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ३१८(४) (फसवणूक) आणि ३१९(२) (चुकीच्या पद्धतीने फसवणूक) आणि आयटी कायद्याच्या कलम ६६D अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकारी पुढील तपास करत आहेत.