Share Market Crash: भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी ८ जानेवारी रोजी मोठी चढ-उतार पाहायला मिळाली. सुरुवातीच्या तेजीनंतर बाजारात विक्रीचा दबाव वाढला आणि बेंचमार्क इंडेक्स सेन्सेक्स व निफ्टी सलग पाचव्या दिवशी घसरणीसह व्यवहार करताना दिसले. सेन्सेक्स दिवसाच्या उच्चांकी स्तरावरून सुमारे ५०० अंकांनी तुटला, तर निफ्टी पुन्हा एकदा २५,८०० चा स्तर ओलांडून खाली आला. परदेशी गुंतवणूकदारांची सततची विक्री आणि कमकुवत जागतिक संकेतांमुळे बाजारातील सेंटिमेंटवर दबाव दिसून आला. जागतिक व्यापाराशी संबंधित अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार जोखीम पत्करणं टाळताना दिसले.
सकाळच्या कामकाजादरम्यान, बीएसई सेन्सेक्स २७१.८८ अंक किंवा ०.३२ टक्क्यांनी घसरून ८३,९०९.०८ च्या पातळीवर होता. तर निफ्टी ८०.२५ अंक किंवा ०.३१% घसरून २५,७९६.६० च्या पातळीवर व्यवहार करत होता.
अर्थसंकल्पापूर्वी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत होऊ शकते वाढ; काय म्हटलंय नव्या रिपोर्टमध्ये
कोणती आहेत ५ मोठी कारणं :
१. परदेशी गुंतवणूकदारांची सततची विक्री
शेअर बाजारावर सर्वात मोठा दबाव परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांच्या (FIIs) सततच्या विक्रीचा राहिला. FIIs नं गुरुवारी भारतीय शेअर्समध्ये सुमारे ३,३६७ कोटी रुपयांची विक्री केली. ते गेल्या चार दिवसांपासून भारतीय बाजारातून पैसे काढून घेत आहेत. जानेवारी महिन्यात आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी सुमारे ८,०१७.५१ कोटी रुपयांची निव्वळ विक्री केली आहे.
२. अमेरिकेतील टॅरिफवरील निर्णयापूर्वी सावधगिरी
गुंतवणूकदारांचे लक्ष अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या त्या महत्त्वाच्या निर्णयाकडे लागलं आहे, ज्यामध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफच्या वैधतेवर निकाल येणार आहे. जर न्यायालयाने हे टॅरिफ अवैध ठरवले, तर अमेरिकन सरकारला आयातदारांना सुमारे १५० अब्ज डॉलर्सपर्यंतची रक्कम परत करावी लागू शकते. जिओजित इन्व्हेस्टमेंटचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार डॉ. व्ही. के. विजयकुमार यांच्या मते, शेअर बाजाराची चाल या निकालावर अवलंबून आहे. हा निकाल ट्रम्प यांच्या विरोधात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर न्यायालयाने टॅरिफ पूर्णपणे अवैध घोषित केलं, तर भारतासारख्या देशांसाठी ही चांगली बातमी असू शकते, कारण ५०% टॅरिफसह भारत सर्वाधिक प्रभावित देशांपैकी एक आहे.
३. टॅरिफबाबत नवीन चिंता
गेल्या काही दिवसांत बाजारावर टॅरिफशी संबंधित भीती पुन्हा एकदा वरचढ ठरली आहे. रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्याबाबत भारतावर अधिक कडक टॅरिफ लावलं जाऊ शकतात, असे संकेत ट्रम्प यांच्याकडून देण्यात आले आहेत. याशिवाय, रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर ५०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावणारे नवीन निर्बंध विधेयक मंजूर होण्याच्या बातम्यांनी चिंता वाढवली आहे. यामुळे गेल्या चार दिवसांत सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये अनुक्रमे १.८% आणि १.७% घसरण झाली आहे.
४. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ भारतीय शेअर बाजारासाठी नकारात्मक ठरली. ब्रेंट क्रूडचा भाव सुमारे ०.५३ टक्क्यांनी वधारून ६२.३२ डॉलर प्रति बॅरलच्या आसपास पोहोचला. भारतासारख्या आयातीवर अवलंबून असलेल्या देशासाठी तेलाच्या वाढत्या किमती महागाई आणि चालू खात्यातील तुटीचा धोका वाढवतात, ज्याचा थेट परिणाम बाजारावर होतो.
५. रुपयाची घसरण
शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात रुपयाही दबावात राहिला आणि डॉलरच्या तुलनेत ७ पैशांनी घसरून ८९.९७ च्या पातळीवर आला. परदेशी गुंतवणूकदारांची विक्री आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे रुपयावर दबाव कायम राहिला. फॉरेक्स ट्रेडर्सच्या मते, अमेरिकन टॅरिफबाबतची अनिश्चितता आणि कमकुवत देशांतर्गत बाजारामुळे परदेशी गुंतवणूकदार सावध आहेत.
टेक्निकल एक्सपर्ट्स काय म्हणाले?
HDFC Securities मधील प्राईम रिसर्च हेड देवर्ष वकील यांच्या मते, निफ्टीनं काही महत्त्वाचे तांत्रिक सपोर्ट लेव्हल तोडले आहेत, ज्यामुळे बाजारातील कमजोरी वाढली आहे. निफ्टी त्याच्या ५०-दिवसांच्या एक्सपोनेंशियल मुव्हिंग ॲव्हरेजच्या (२५,९११) खाली घसरलाय. तसंच २५,८७८ चा पूर्वीचा सपोर्ट लेव्हलही तुटला आहे. आता पुढील मजबूत सपोर्ट २५,७०० जवळ दिसत आहे, जो डिसेंबर २०२५ च्या नीचांकी स्तराच्या आसपास आहे. वरच्या बाजूला २६,००० ते २६,०५० ची श्रेणी सध्या मजबूत रेझिस्टन्स म्हणून काम करू शकते.
