Share Market : आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजार वाढीसह बंद झाला, पण सुरुवातीला मिळालेली मोठी उसळी दुपारनंतर कायम राहिली नाही. आज (सोमवारी) मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४५५ अंकांच्या वाढीसह ८२,१७६ अंकांवर स्थिरावला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १४८ अंकांनी वाढून २५,००१ अंकांवर पोहोचला. दिवसाच्या सुरुवातीला सेन्सेक्स ८२,४९२ आणि निफ्टी २५,०७९ अंकांपर्यंत पोहोचला होता, पण नंतर विक्रीचा दबाव वाढल्याने ही तेजी काही प्रमाणात कमी झाली.
कोण वधारले, कोण घसरले?
आज सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या ३० पैकी २२ कंपन्यांचे शेअर्स हिरव्या रंगात (वाढीसह) बंद झाले, तर ८ कंपन्यांचे शेअर्स लाल रंगात (घसरणीसह) बंद झाले. निफ्टीमध्ये ५० पैकी ३८ कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ दिसली, तर १२ कंपन्यांचे शेअर्स घसरले. सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर्स सर्वाधिक २.१७ टक्क्यांनी वाढले, तर इटरनलचे शेअर्स सर्वाधिक ४.५५ टक्क्यांनी घसरले.
या दिग्गजांनी दिली साथ
आज शेअर बाजाराला एचसीएल टेक, टाटा मोटर्स, नेस्ले इंडिया, आयटीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि टेक महिंद्रा यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्सनी चांगली साथ दिली. त्यांच्या शेअर्समध्ये १ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. याशिवाय लार्सन अँड टुब्रो, इन्फोसिस, इंडसइंड बँक, टायटन, आयसीआय बँक, भारती एअरटेल, बजाज फिनसर्व्ह, टीसीएस आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या मोठ्या कंपन्यांचे शेअर्सही वाढीसह बंद झाले.
या कंपन्यांना फटका
दुसरीकडे, अल्ट्राटेक सिमेंट, पॉवर ग्रिड, कोटक महिंद्रा बँक, एनटीपीसी, टाटा स्टील, सन फार्मा आणि मारुती सुझुकी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज घसरण दिसून आली. आज बाजाराने सकारात्मक सुरुवात केली असली तरी, मोठ्या तेजीत रूपांतर होण्यासाठी आणखी काही घटकांची प्रतीक्षा करावी लागेल.