Share Market : शेअर बाजारात आज 'सेन्सेक्स विकली एक्स्पायरी'च्या दिवशी प्रचंड चढ-उतार पाहायला मिळाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफ पॉलिसी आणि इराणवरील संभाव्य निर्बंधांच्या धास्तीने बाजारात विक्रीचा दबाव असतानाही, सार्वजनिक बँका आणि मेटल शेअर्सनी बाजार सावरला. दिवसाअखेर मुख्य निर्देशांक घसरणीसह बंद झाले असले, तरी गुंतवणूकदारांच्या एकूण संपत्तीत ३२,१८४ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
बाजार घसरला तरी गुंतवणूकदार 'फायद्यात'!
- बाजारात आज कमालीची तणावाची स्थिती होती. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही लाल निशाण्यात बंद झाले.
- सेन्सेक्स : २४४.९८ अंकांच्या (०.२९%) घसरणीसह ८३,३८२.७१ वर स्थिरावला.
- निफ्टी ५०: ६६.७० अंकांच्या (०.२६%) घसरणीसह २५,६६५.६० वर बंद झाला.
- परंतु, ब्रॉड मार्केटमध्ये (मिडकॅप आणि स्मॉलकॅप) खरेदीचा कल दिसून आल्यामुळे बीएसईवरील कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप ४.६७ लाख कोटींवरून वाढून ४.६८ लाख कोटींवर पोहोचले. परिणामी गुंतवणूकदारांची संपत्ती ३२ हजार कोटींनी वधारली.
क्षेत्रनिहाय कामगिरी : बँका आणि मेटल चमकले
आजच्या सत्रात क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये मोठी तफावत पाहायला मिळाली. पीएसयू बँक आणि मेटल इंडेक्समध्ये २ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. टाटा स्टील, एनटीपीसी आणि ॲक्सिस बँक हे सेन्सेक्सचे टॉप गेनर्स ठरले. तर आयटी शेअर्समध्ये १ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. टीसीएस, एशियन पेंट्स आणि मारुती या शेअर्सना नफावसुलीचा फटका बसला.
जागतिक कारणांमुळे बाजारावर दबाव
इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर २५% टॅरिफ लावण्याची ट्रम्प यांची धमकी आणि अमेरिकन सुप्रीम कोर्टात या धोरणाबाबत होणारा फैसला, यामुळे जागतिक गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता आहे. याचा थेट परिणाम भारतीय आयटी कंपन्यांवर होताना दिसत आहे, ज्यांचा महसूल मोठ्या प्रमाणावर अमेरिकेवर अवलंबून आहे.
वाचा - गुंतवणूकदारांची दिवाळी! RBI च्या निर्णयामुळे गुंतवणूकदार मालामाल; ५ वर्षांत पैसा झाला ३ पट!
बीएसईवरील व्यवहारांची आकडेवारी
बीएसईवर आज एकूण ४,३४४ शेअर्समध्ये ट्रेडिंग झाले. यापैकी २,०१२ शेअर्समध्ये वाढ झाली. तर २,१५३ स्टॉक्समध्ये घसरण नोंदवण्यात आली. आज ८८ शेअर्सनी ५२-आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला. याउलट १८८ शेअर्सना 'अप्पर सर्किट' तर १४९ शेअर्सना 'लोअर सर्किट' लागले.
