Share Market Update: भारतीय शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि निफ्टी ५० च्या बेंचमार्क निर्देशांकांनी गुरुवारी, १५ मे रोजी इंट्राडे व्यवहारात जोरदार वाढ नोंदवली. कामकाजादरम्यान एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजसह निवडक दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदारी तेजी आली. सेन्सेक्स बुधवारच्या ८१,३३०.५६ च्या तुलनेत ८१,३५४.४३ वर उघडला आणि कामकाजादरम्यान १,३०० अंकांनी म्हणजेच १.७ टक्क्यांनी वधारून ८२,७१८ च्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. दिवसभरातील नीचांकी पातळीवरून सेन्सेक्स १९५५ अंकांनी सावरला. निफ्टी ५० नं पुन्हा २५,००० चा टप्पा ओलांडला. निफ्टीनं दिवसाची सुरुवात २४,६६६.९० च्या तुलनेत २४,६९४.४५ वर केली आणि नंतर १.७ टक्क्यांनी वधारून २५,०८९ चा उच्चांक गाठला.
प्रामुख्याने देशांतर्गत निर्देशांकांची मजबुती, निवडक क्षेत्रातील खरेदी आणि जागतिक बाजारांचा संमिश्र प्रभाव यामुळे ही तेजी दिसून आली. बँक निफ्टी आणि बीएसई बँकेक्समध्येही १.०२% आणि १.११% वाढ दिसून आली.
निवडक लार्ज कॅप शेअर्समध्ये व्हॅल्यू बाईंग
नुकत्याच झालेल्या करेक्शननंतर निवडक हेवीवेट शेअर्समध्ये व्हॅल्यू बाईंग होत आहे, ज्यामुळे मार्केट बेंचमार्कमध्ये वाढ झाली आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. सेन्सेक्स निर्देशांकात टाटा मोटर्स, एचसीएल टेक, इटर्नल, अदानी पोर्ट्स आणि मारुती यांचे समभाग सर्वाधिक २ ते ४ टक्क्यांनी वधारले.
अमेरिका-भारत ट्रेड डीलची शक्यता
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केलाय की, भारतानं विनाशुल्क किंवा शून्य शुल्काच्या व्यापार कराराचा प्रस्ताव ठेवला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी, भारतानं अमेरिकेसोबत नो टॅरिफ ट्रेड कराराचा प्रस्ताव ठेवला असल्याचं म्हटलं. संभाव्य अमेरिका-भारत व्यापार कराराबाबत वाढत्या आशावादाचा परिणाम बाजाराच्या सेंटिमेंट्सवर झाला आणि बाजारातील बेंचमार्कला चालना मिळाली.