ED Raid : ऑनलाइन पबजी गेम खेळताना प्रेमात पडलेली पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि सचिन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. केंद्रीय तपास संस्था अंमलबजावणी संचालनालयने सुमारे ६५० कोटी रुपयांच्या 'इनपुट टॅक्स क्रेडिट' गैरव्यवहार प्रकरणी आज देशभरात मोठी शोध मोहीम राबवली. दिल्ली, हरियाणा, अरुणाचल प्रदेश, तामिळनाडू आणि तेलंगणासह अनेक राज्यांमधील विविध ठिकाणांवर ईडीने छापे टाकले. या प्रकरणात आरोपी आणि कंपन्यांवर कठोर कारवाई करत ईडीने महत्त्वपूर्ण पुरावे गोळा केले आहेत. या प्रकरणा आता सीमा हैदर आणि तिचा पती सचिन यांचीही नावे समोर आली आहेत.
बनावट कंपन्या आणि करचोरीचा मोठा गैरव्यवहार
ईडीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी बोगस कंपन्या आणि शेल कंपन्या तयार करून करचोरी आणि मनी लाँड्रिंगसारखे गैरव्यवहार केले. या गैरव्यवहारासाठी आरोपींनी पाकिस्तानमधून आलेल्या सीमा हैदर आणि तिच्या पती सचिन यांच्या नावानेही बनावट ओळखपत्रे वापरली. तपासामध्ये हे समोर आले आहे की, आरोपींनी कोणत्याही प्रत्यक्ष व्यावसायिक व्यवहाराशिवाय केवळ बनावट बिले तयार करून सरकारकडून सुमारे ६५० कोटी रुपयांचा टॅक्स लाभ घेतला.
दोन चार्टर्ड अकाउंटंट्सना अटक
या घोटाळ्यातून मिळालेली रक्कम हवाला आणि इतर बेकायदेशीर कामांसाठी वापरली जात होती, असेही तपासात उघड झाले आहे. २०१९ मध्ये अरुणाचल प्रदेश पोलिसांनी याच प्रकरणी बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील दोन चार्टर्ड अकाउंटंट भावांना, आशुतोष आणि विपिन झा यांना अटक केली होती. त्यांनी सीमा हैदर आणि तिच्या पती सचिनच्या नावाने बनावट आयडी तयार करून सुमारे ९९.२१ कोटी रुपयांचे 'इनपुट टॅक्स क्रेडिट' मिळवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
अरुणाचल प्रदेशच्या इटानगरमधील राहुल जैन यांच्या 'सिद्धिविनायक ट्रेड मर्चंट' नावाच्या कंपनीशी संबंधित हे प्रकरण आहे. ईडीच्या पुढील कारवाईमध्ये अनेक आरोपींची चौकशी केली जाईल आणि या घोटाळ्याच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल. जीएसटी प्रणालीची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि करचोरी रोखण्यासाठी ईडीने उचललेले हे एक मोठे पाऊल मानले जात आहे. यामुळे अशा बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांवर अंकुश लावता येईल.