लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : नव्या वर्षात बहुतांश कार कंपन्या दरांमध्ये वाढ करणार असल्याने नवीन गाड्यांसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. अशात येत्या काळात जुन्या आणि सेकंड हँड इलेक्ट्रिक गाड्यांही महाग होण्याची चिन्हे दिसत आहेत. या गाड्यांवरील वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी १२ टक्केवरून वाढवून १८ टक्के इतका करण्याची शिफारस जीएसटी कौन्सिलच्या अंतर्गत असलेल्या केंद्र आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांच्या फिटमेंट कमिटीने केल्याचे सू्त्रांनी सांगितले. पेट्रोल तसेच डिझेलवर चालणाऱ्या लहान कारवरही जीएसटी १२ टक्केऐवजी १८ टक्के करण्याच्या विचार जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत केला जाऊ शकतो. जीएसटी कौन्सिलची पुढील ५५ वी बैठक २१ डिसेंबर रोजी राजस्थानच्या जैसलमेर येथे होणार आहे.
सध्या नव्या ईव्हींवर किती लागतो कर?
सध्या नव्या ईव्ही गाड्यांवर ५ टक्के इतका जीएसटी आकारला जात आहे तर वापरेल्या अर्थात सेकंड हँड ईव्हीवर १२ टक्के इतका जीएसटी आकारला जातो. सेकंड हँड ईव्हीवरही एसयूव्ही गाड्यांइतकाच म्हणजेच १८ टक्के जीएसटी आकारावा, अशी शिफारस फिटमेंट कमिटीने जीएसटी कौन्सिलला केल्याचे समजते.
इतर वाहनांवर किती?
पेट्रोल, सीएनजीवर चालणाऱ्या गाड्या, १२०० सीसीपेक्षा अधिक क्षमतेच्या गाड्या, स्पोर्ट युटिलिटी व्हेहिकल्स यांच्यावर १८ टक्के इतका जीएसटी आकारला जात आहे.
तंबाखू, शीतपेयांवर ३५ टक्के जीएसटी?
जीएसटीचे दर तर्कसंगत करण्यासाठी मंत्रिगटाने आतापर्यंत जीएसटी कौन्सिलला आपल्या शिफारसी सादर केलेल्या नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्रिगटाने अनेक उत्पादने आणि सेवांवरील जीएसटी दरांमध्ये बदल करण्याची सूचना केली आहे. सिगारेट, तंबाखू, शीतपेये आदी उत्पादनांवरील सध्याचा २८ टक्के इतका जीएसटी ३५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात यावा, अशी शिफारस केल्याचे समजते.