Lenskart IPO News: चष्मा बनवणारी कंपनी लेन्सकार्टच्या आयपीओला (IPO) सेबीनं (SEBI) मंजुरी दिली आहे. आता कंपनी IPO साठी इश्यू प्राईस आणि लॉन्चिंगची तारीख लवकरच जाहीर करेल. असा अंदाज आहे की नोव्हेंबरमध्ये कंपनीची लिस्टिंग होऊ शकतं. एकूण IPO चा आकार ७,५०० ते ८,००० कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. यामुळे हा IPO टाटा कॅपिटल (Tata Capital) आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्स (LG Electronics) नंतर या वर्षातील सर्वात मोठ्या इश्यूपैकी एक ठरेल.
IPO मध्ये किती फ्रेश इश्यू?
लेन्सकार्टच्या ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार (DRHP) IPO मध्ये २,१५० कोटी रुपयांच्या इक्विटी शेअर्सचा एक नवीन इश्यू (Fresh Issue) समाविष्ट असेल. यासोबतच, १३.२ कोटी शेअर्सची विक्री ऑफरदेखील (OFS) असेल, जे सध्याचे गुंतवणूकदार आणि प्रमोटर्स करतील. ऑफर फॉर सेलध्ये (OFS) सहभाग घेणाऱ्या प्रमुख भागधारकांमध्ये सॉफ्टबँक (SoftBank) समर्थित एसव्हीएफ II, अल्फा वेव्ह व्हेंचर्स, टेमासेकचे सहयोगी, प्रेमजी इन्व्हेस्ट आणि केदारा कॅपिटल यांचा समावेश आहे.
Penny Stock देणार १० बोनस शेअर्स, कधी आहे रकॉर्ड डेट? ५ वर्षांत ११००% वधारला 'हा' शेअर
कोण विकतंय हिस्सा?
लेन्सकार्टच्या प्रमोटर्सपैकी पीयूष बंसल हे २ कोटी शेअर्स विकतील, तर नेहा बंसल, अमित चौधरी आणि सुमीत कपाही हे प्रत्येकी आपला छोटा हिस्सा विकतील. सध्या प्रमोटर्सकडे कंपनीचा एकत्रित १९.९६ टक्के हिस्सा आहे, तर संस्थात्मक आणि अन्य भागधारकांकडे ८०.०४ टक्के हिस्सा आहे. लेन्सकार्टनं आर्थिक वर्ष २०२५ मध्ये २९७.३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला, तर आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीला १०.२ कोटी रुपयांचं नुकसान झालं होतं.
उत्पन्नदेखील वर्ष-दर-वर्ष २३ टक्क्यांनी वाढून ६,६५२.५ कोटी रुपये झालं आहे, ज्यामध्ये मागील दोन वर्षांत ३३ टक्के इतका सीएजीआर (CAGR) नोंदवण्यात आलाय.
IPO च्या रकमेचा वापर कशासाठी?
IPO मधून उभारलेला निधी कंपनीद्वारे चालवल्या जाणाऱ्या आणि कंपनीच्या मालकीचे नवीन स्टोअर्स सुरू करण्यासाठी तसेच लीज, भाडं आणि परवाना करारांच्या पेमेंटसाठी वापरला जाईल. यासोबतच, या निधीचा वापर टेक्नॉलॉजी, क्लाऊड-संबंधित पायाभूत सुविधा (Cloud-related Infra), ब्रँडचं मार्केटिंग आणि व्यवसायाच्या प्रमोशनसाठी केला जाईल. कोटक महिंद्रा, मॉर्गन स्टॅनली, सिटी, एवेंडस कॅपिटल आणि इंटेंसिव्ह फिस्कल सर्विसेज हे या IPO चे मर्चंट बँकर आहेत.
कंपनीबद्दल अधिक माहिती
२००८ साली स्थापित झालेली लेन्सकार्ट कंपनी जगभरात २००० पेक्षा जास्त स्टोअर्स चालवते. कंपनीची ऑनलाइन आणि ऑफलाइन उपस्थिती मजबूत आहे. सॉफ्टबँक, एडीआयए, टेमासेक, केकेआर, अल्फा वेव्ह, टीपीजी आणि केदारा कॅपिटल यांसारख्या प्रमुख जागतिक गुंतवणूकदारांचं कंपनीला समर्थन आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)