SBI News: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानं आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. डिजिटल पेमेंट प्रणालीवरील वाढत्या अवलंबित्वेमुळे, एसबीआयनं आपल्या लोकप्रिय 'mCASH' फीचरला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
बँकेनं स्पष्ट केलंय की ३० नोव्हेंबर २०२५ नंतर, mCASH द्वारे पैसे पाठवण्याची आणि क्लेम करण्याची सुविधा OnlineSBI आणि YONO Lite वर उपलब्ध नसेल. याचा अर्थ, १ डिसेंबर २०२५ पासून ही सेवा कायमस्वरूपी बंद होईल. जे ग्राहक या फीचरचा वापर करत होते, त्यांच्या बँकिंग कामकाजात येत्या काही दिवसांत बदल दिसून येतील.
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
mCASH काय करत होते?
mCASH ही एक अशी सुविधा होती, ज्याद्वारे एसबीआयचे ग्राहक कोणत्याही लाभार्थीला रजिस्टर न करता, केवळ मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडी वापरून कोणालाही पैसे पाठवू शकत होते. ही सेवा विशेषतः त्वरित किंवा लहान रक्कम ट्रान्सफर करणाऱ्या लोकांसाठी खूप उपयुक्त होती. पैसे प्राप्त करणाऱ्या व्यक्तीला एक सुरक्षित लिंक आणि ८ अंकी पासकोड मिळत होता, ज्याद्वारे तो कोणत्याही बँक खात्यात पैसे क्लेम करू शकत होता.
mCASH सेवा आता का बंद होत आहे?
एसबीआयनं आपल्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार ३० नोव्हेंबर २०२५ नंतर ही सुविधा काढून टाकली जात आहे आणि ग्राहकांनी याऐवजी UPI, IMPS, NEFT आणि RTGS सारख्या सुरक्षित आणि प्रगत पेमेंट पर्यायांचा वापर करावा. बँकेचा उद्देश डिजिटल व्यवहारांना अधिक सुरक्षित आणि जलद बनवणं आहे आणि mCASH प्रणाली जुन्या डिजिटल संरचनेवर काम करत होती.
आता पैसे कसे ट्रान्सफर कराल?
mCASH बंद झाल्यानंतर, एसबीआयनं ग्राहकांना BHIM SBI Pay (UPI ॲप), IMPS आणि इतर डिजिटल पद्धतींचा अवलंब करण्याचा सल्ला दिला आहे. यूपीआय (UPI) द्वारे पैसे पाठवण्यासाठी, खालीलप्रमाणे प्रक्रिया वापरू शकता:
- BHIM SBI Pay ॲपमध्ये लॉगिन करा.
- ‘Pay’ पर्याय निवडा.
- VPA, अकाउंट-IFSC किंवा QR कोडपैकी कोणताही एक पर्याय निवडा.
- आवश्यक माहिती भरा.
- डेबिट खाते निवडून ‘टिक मार्क’ (✓) दाबा.
- UPI PIN टाका आणि पेमेंट पूर्ण करा.
ग्राहकांवर काय परिणाम होईल?
जे लोक mCASH चा वापर करून लाभार्थी जोडल्याशिवाय पैसे पाठवत होते, त्यांना आता UPI किंवा IMPS सारख्या पर्यायांवर शिफ्ट व्हावं लागेल. नवीन पर्याय अधिक सुरक्षित आणि जलद असला तरी, mCASH सुविधा बंद झाल्यामुळे काही ग्राहकांसाठी थोडी गैरसोय होऊ शकते.
