SBI Mutual Fund IPO: भारतातील सर्वात मोठी म्युच्युअल फंड कंपनी, एसबीआय फंड्स मॅनेजमेंट, आपल्या आयपीओसाठी (IPO) फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत मसुदा दस्तऐवज (Draft Prospectus) दाखल करण्याची शक्यता आहे. ही कंपनी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि फ्रान्सची कंपनी अमुंदी (Amundi) यांचा संयुक्त उपक्रम आहे. या आयपीओद्वारे एसबीआय आपली ६.३% आणि अमुंदी ३.७% अशी एकूण १०% भागीदारी विकणार आहे.
कंपनीचा आकार आणि मूल्यांकन
३१ डिसेंबरपर्यंत कंपनीकडे १२.५ लाख कोटी रुपयांची असेट अंडर मॅनेजमेंट (AUM) होती. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये कंपनीचा निव्वळ नफा २,५३१ कोटी रुपये इतका राहिला आहे. गुंतवणूक बँकरनी कंपनीचं मूल्य १२ ते १४ अब्ज डॉलर इतके निश्चित केलं असून १.२ ते १.४ अब्ज डॉलरचा आयपीओ आणण्याचा सल्ला दिला आहे.
सोन्या-चांदीची किंमत विक्रमी उच्चांकावर; Silver मध्ये १७,२५७ ची तर Gold मध्ये ₹४९२६ ची वाढ
आयपीओ प्रक्रिया आणि वेळापत्रक
एप्रिलमध्ये आयपीओ खुला व्हावा, या उद्देशाने फेब्रुवारीच्या मध्यंतरी किंवा तिसऱ्या आठवड्यापर्यंत मसुदा दस्तऐवज दाखल करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. मात्र, ही प्रक्रिया बाजारपेठेतील स्थिती आणि भारतीय बाजार नियामक सेबीच्या (SEBI) मंजुरीवर अवलंबून असेल. सेबीकडून मंजुरी मिळण्यासाठी साधारणपणे दोन ते तीन महिने लागतात.
या आयपीओच्या व्यवस्थापनासाठी एसबीआय कॅपिटल मार्केट्स, कोटक महिंद्रा कॅपिटल, ॲक्सिस बँक यांसह नऊ बँकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुरुवातीला सिटीग्रुप आणि जेपी मॉर्गन यांसारख्या मोठ्या बँका शुल्कावरून झालेल्या मतभेदांमुळे या प्रक्रियेतून बाहेर पडल्या होत्या. अंतिम मूल्यांकन हे दस्तऐवज दाखल करण्याच्या वेळी निश्चित केलं जाईल.
भारतीय आयपीओ बाजारातील कल
भारतीय आयपीओ बाजार सध्या तेजीत आहे. वर्ष २०२५ मध्ये १०३ कंपन्यांनी १.७६ लाख कोटी रुपये जमा केले आहेत. नुकताच गेल्या महिन्यात आयसीआयसीआय प्रुडेन्शियल ॲसेट मॅनेजमेंटचा १.२ अब्ज डॉलरचा आयपीओ आला होता, तर कॅनरा रोबेको ॲसेट मॅनेजमेंट गेल्या ऑक्टोबरमध्ये शेअर बाजारात लिस्ट झाली होती. केंद्र सरकारनं सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना त्यांच्या उपकंपन्या शेअर बाजारात लिस्ट करण्यास सांगितलं आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
