SBI Saving Schemes : भारतीय रिझर्व्ह बँकेने या वर्षात रेपो रेटमध्ये १.२५ टक्के कपात केली आहे. आता रेपो दर ०.२५ टक्क्यांनी कमी होऊन ५.२५ टक्क्यांवर पोहोचला आहे. या कपातीनंतर अनेक बँकांनी त्यांच्या मुदत ठेव योजनांवरील व्याजदर कमी केले आहेत. मात्र, देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेत काही विशिष्ट मुदतीच्या एफडीवर आजही आकर्षक व्याज मिळत आहे.
ज्येष्ठ नागरिकांना ७.०५% चा मोठा लाभ
एसबीआयमध्ये ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंतच्या मुदतीसाठी एफडी खाते उघडण्याची सुविधा आहे. बँक सध्या एफडी खात्यांवर ३.०५ टक्के ते ७.०५ टक्के पर्यंत व्याज देत आहे. विशेष म्हणजे, एसबीआयच्या ५ वर्षांच्या एफडी योजनेत ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक म्हणजेच ७.०५ टक्के व्याजदर मिळत आहे. या तुलनेत, सर्वसामान्य नागरिकांसाठी हा दर ६.०५ टक्के आहे. तसेच, ४४४ दिवसांच्या 'अमृत वृष्टी' स्पेशल एफडी स्कीमवर सामान्य नागरिकांना ६.४५ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ६.९५ टक्के व्याज मिळत आहे.
२ लाखांवर मिळणारे निश्चित उत्पन्न
एसबीआयच्या ५ वर्षांच्या एफडीमध्ये जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक म्हणून २ लाख रुपये जमा केले, तर तुम्हाला मुदतपूर्तीनंतर एकूण २,८३,६५२ रुपये मिळतील. यामध्ये ८३,६५२ रुपयांचे निश्चित व्याज समाविष्ट आहे. याचा अर्थ, केवळ २ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर ५ वर्षांत ८३ हजारांहून अधिक उत्पन्न निश्चित आहे.
जर सर्वसामान्य नागरिकांनी (६० वर्षांपेक्षा कमी वय) याच योजनेत २ लाख जमा केले, तर ६.०५ टक्के दराने मुदतपूर्तीनंतर त्यांना एकूण २,७०,०३५ रुपये मिळतील, ज्यात ७०,०३५ रुपये व्याज असेल.
या आकडेवारीवरून स्पष्ट होते की, सध्याच्या कमी व्याजदराच्या वातावरणातही एसबीआयच्या ५ वर्षांच्या एफडीमधील ७.०५% चा बंपर रिटर्न, विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठी, एक सुरक्षित आणि निश्चित उत्पन्नाचा चांगला पर्याय ठरत आहे.
