NSE-BSE Trading: शेअर बाजारातील ट्रेडिंगसाठी आठवड्याचे दिवस निश्चित असतात. सोमवार ते शुक्रवार या काळात नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि मुंबई शेअर बाजारामध्ये (BSE) ट्रेडिंग सेशन्स होतात. मात्र, १० जानेवारी, शनिवारी NSE आणि BSE वर 'मॉक ट्रेडिंग' सत्राचे आयोजन केलं जात आहे, जेणेकरून स्टॉक मार्केट एक्सचेंज आपल्या सिस्टमची चाचणी करू शकतील. हे मॉक ट्रेडिंग सत्र सेबीनं (SEBI) जारी केलेल्या निर्देशानुसार 'अल्टरनेट ट्रेडिंग व्हेन्यू मेकॅनिझम'ची चाचणी आहे. BSE आणि NSE नं आपली नियमित तयारी आणि सिस्टम पूर्णपणे तयार ठेवण्यासाठी शनिवारी इक्विटी आणि डेरिव्हेटिव्ह सेगमेंटसाठी या मॉक ट्रेडिंग सत्राचं आयोजन केलंय.
मॉक ट्रेडिंग सत्राची आवश्यकता का आहे?
सामान्यतः स्टॉक एक्सचेंज आपल्या ट्रेडिंग सिस्टमची मजबूती तपासण्यासाठी मॉक ट्रेडिंग सत्राचं आयोजन करतात. या संदर्भात सेबीच्याही आवश्यक मार्गदर्शक सूचना आहेत. NSE आणि BSE सारखे स्टॉक एक्सचेंज आपली ट्रेडिंग सिस्टम तपासण्यासाठी, सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी आणि कोणत्याही अनपेक्षित अडथळ्याच्या परिस्थितीसाठी तयार राहण्यासाठी या सत्राचं आयोजन करतात. मॉक ट्रेडिंग सत्राचा मुख्य उद्देश सिस्टमच्या मजबुतीची तपासणी करणे हा आहे, ज्यामध्ये ट्रेडिंग प्लॅटफॉर्म, रिस्क मॅनेजमेंट मॉड्यूल आणि एक्सचेंजशी असलेली कनेक्टिव्हिटी सुरळीतपणे काम करत आहे की नाही, हे तपासलं जातं. याशिवाय, एक्सचेंज अनेकदा नवीन सॉफ्टवेअर व्हर्जन जसं की २०२६ मधील 'BOLT Pro TWS व्हर्जन १२.५०' ची चाचणी देखील करतात.
Tata च्या 'या' कंपनीनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे स्टॉक?
मॉक ट्रेडिंग सत्रात कोण सहभागी होऊ शकते?
स्टॉक एक्सचेंजच्या या मॉक ट्रेडिंग सत्रातून ट्रेडिंग मेंबर्स, ज्यामध्ये थर्ड पार्टी ट्रेडिंग प्लॅटफॉर्म वापरणाऱ्यांचाही समावेश आहे, त्यांना आपल्या ॲप्लिकेशन आणि इन्फ्राची चाचणी घेण्याची संधी मिळेल. मॉक ट्रेडिंग सत्रं सहसा शनिवारी आयोजित केली जातात. यामध्ये ब्रोकर आणि मार्केट पार्टिसिपंट्सना त्यांचे ऑर्डर मॅनेजमेंट सिस्टम अपडेट करण्यासाठी, रिस्क मॅनेजमेंटची चाचणी करण्यासाठी आणि लाईव्ह मार्केटवर परिणाम न होता नवीन फीचर्स किंवा असाधारण परिस्थितींशी परिचित होण्यासाठी मदत करण्यासाठी डिझाइन केलेलं आहे. सत्रादरम्यान प्रदर्शित होणाऱ्या किमती या केवळ चाचणीसाठी असतात आणि त्या वास्तविक बाजार हालचालींचे प्रतिनिधित्व करत नाहीत.
१० जानेवारीच्या सत्रादरम्यान ट्रेडिंग मेंबर्स कॉल ऑक्शन सेशन, रिस्क-रिडक्शन मोड, ट्रेडिंग हॉल्ट आणि ब्लॉक डील सिस्टमसह विविध प्रकारच्या कार्यक्षमतेची चाचणी घेऊ शकतील. एक्सचेंजनं म्हटलंय की, या सरावामध्ये बाजारातील असाधारण परिस्थितींचाही समावेश केला जाईल, ज्यामुळे सहभागींना तणावाच्या काळात सिस्टमच्या वर्तनाचं आकलन करण्यास मदत होईल.
मॉक ट्रेडिंग सत्राची वेळ
मॉक ट्रेडिंग सत्र एका विस्तृत कार्यक्रमानुसार चालेल, ज्याची सुरुवात सकाळी १०:१५ ते १०:४५ या वेळेत लॉगिन विंडोनं होईल. त्यानंतर सकाळची ब्लॉक डील विंडो, प्री-ओपन सत्र, T+1 आणि T+0 दोन्ही सेगमेंटसाठी सलग ट्रेडिंग, IPO आणि री-लिस्टेड सिक्युरिटीजसाठी विशेष प्री-ओपन सत्र, कॉल ऑक्शन, सेटलमेंट ऑक्शन, दुपारची ब्लॉक डील विंडो आणि पोस्ट-क्लोजिंग ॲक्टिव्हिटी होतील. सत्राचा भाग म्हणून T+1 आणि T+0 दोन्ही व्यवहारांसाठी 'ट्रेड मॉडिफिकेशन विंडो' देखील सक्षम केली जाईल.
वास्तविक बाजारातील अनिश्चितता दर्शवण्यासाठी काही ऑर्डर एंट्री सत्रांच्या शेवटी अचानक अडथळे येतील. उदाहरणार्थ, प्री-ओपन आणि पिरीयॉडिक कॉल ऑक्शन सत्रांसाठी शेवटच्या मिनिटात आणि IPO व री-लिस्टेड शेअर्ससाठी विशेष प्री-ओपन सत्रांसाठी शेवटच्या १० मिनिटांत ऑर्डर एंट्री अचानक थांबू शकते. या प्रक्रियेअंतर्गत एक्सचेंज आपल्या ट्रेडिंग वर्कस्टेशनचे नवीन व्हर्जन 'बोल्ट प्रो टीडब्ल्यूएस व्हर्जन १२.५०' (BOLT Pro TWS Version 12.50) देखील जारी करेल.
अल्टरनेट ट्रेडिंग व्हेन्यू मेकॅनिझमची चाचणी
आगामी मॉक सत्राचं मुख्य आकर्षण म्हणजे सेबीनं जारी केलेल्या निर्देशानुसार 'अल्टरनेट ट्रेडिंग व्हेन्यू मेकॅनिझम'ची चाचणी आहे. १० जानेवारीच्या मॉक सत्रात अशा एका परिस्थितीचा समावेश असेल ज्यामध्ये NSE मध्ये अडथळा निर्माण केला जाईल, त्यानंतर इक्विटी सेगमेंटमध्ये NSE-एक्स्क्लुझिव्ह सिक्युरिटीजसाठी BSE चा 'अल्टरनेट ट्रेडिंग व्हेन्यू' म्हणून वापर केला जाईल. या चाचणीचा उद्देश हा आहे की, जर एका एक्सचेंजमध्ये तांत्रिक अडथळा आला, तरीही ट्रेडिंग अखंडपणे सुरू राहू शकेल याची खात्री करणं हे आहे.
