आरबीआयने देशभरातील बँकांसाठी बचत खात्यांवरील व्याजदरांशी, एफडी व चालू खात्या संबंधित नवे नियम जारी केले आहेत. त्यानुसार बँकांना बचत खात्यातील १ लाख रुपये पर्यंतच्या रकमेवर समान दराने व्याज द्यावे लागणार आहे. खात्यातील रक्कम एक लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास वेगळे व्याजदर लागू करता येतील. प्रत्येक दिवसाच्या शेवटी खात्यात जमा केलेल्या रकमेनुसार व्याज आकारले जाईल. बँकांना दर तीन महिन्यांनी एकदा खात्यात व्याज जमा करावे लागेल.
व्याजदरावर वाटाघाटी नाही
एफडीचा मॅच्युरिटी कालावधी व्यवसाय नसलेल्या दिवशी आला, तरीही ग्राहकाला त्या दिवसाचे व्याज मिळेल आणि बँक पुढच्या व्यवसायाच्या दिवशी पेमेंट करेल. बँकांनी सर्व एफडी नियम ग्राहकांना आगाऊ सांगितलं पाहिजेत. बँका स्वतः दंडाची रक्कम ठरवू शकतात. ग्राहक आणि बँक यांच्यात व्याजदरावर कोणत्याही वाटाघाटी होणार नाही.
सोन्याच्या दरात जोरदार तेजी, चांदीचा दर २ लाखांच्या जवळ; एकाच झटक्यात २४०० रुपयांची तेजी
हे नियमदेखील लागू
बँक कर्मचारी, निवृत्त कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना एफडी, बचत खात्यावर १% अतिरिक्त व्याज दिलं जाऊ शकते. बँका ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र, जास्त व्याजदराच्या एफडी योजना देऊ शकतात. जर मुदत ठेवीच्या (टीडी) मुदतपूर्तीनंतर रक्कम काढली गेली नाही, तर बचत खात्याचा व्याजदर किंवा टीडीचा मूळ व्याजदर यातील सर्वात कमी व्याजदर लागू होईल. ३ कोटी व त्यापेक्षा अधिक एफडीवर वेगळे व्याजदर लागू होतील.
साधारणपणे, चालू खात्यावर कोणतंही व्याज दिलं जात नाही. मात्र, खातेधारकाच्या मृत्यूच्या बाबतीत, मृत्यूच्या तारखेपासून पैसे भरेपर्यंत बचत खात्याच्या दरानं व्याज दिले जाईल. हे नियम ग्राहकांच्या हितासाठी घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
