Salary Hike : जसा मार्च एप्रिल महिना जवळ येतो, तसा कर्मचाऱ्यांच्या मनात या वर्षी आपली किती वेतनवाढ होईल, असा प्रश्न येतो. दरम्यान, या वर्षी कर्मचाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळण्याची शक्यता आहे. या वर्षी भारतीय कर्मचाऱ्यांना सर्व उद्योगांमध्ये सरासरी ९.४ टक्के पगारवाढ अपेक्षित आहे. एचआर कन्सल्टन्सीच्या सर्वेक्षणानुसार गेल्या पाच वर्षांत कर्मचाऱ्यांच्या पगारात सातत्यानं वाढ होत आहे. २०२० मध्ये पगारवाढ ८ टक्के होती. आता २०२५ मध्ये तो वाढून ९.४ टक्के होईल, असा अंदाज आहे. या सर्वेक्षणात भारतातील विविध क्षेत्रातील १,५५० हून अधिक कंपन्यांनी सहभाग घेतला होता.
लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
या क्षेत्रांचा समावेश
यामध्ये टेक्नॉलॉजी, कन्झुमर गुड्स, फायनान्शिअल सर्व्हिसेस, मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोटिव्ह आणि इंजिनीअरिंग या क्षेत्रांचा समावेश आहे. ऑटोमोटिव्ह क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या वेतनात गेल्या वर्षीच्या ८.८ टक्क्यांच्या तुलनेत यंदा १० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी. सरकारच्या मेक इन इंडिया उपक्रमाचा हा एक भाग असल्यानं या कॅटेगरीला चालना मिळाली आहे.
अशी आहे आकडेवारी
मॅन्युफॅक्चरिंग आणि इंजिनीअरिंग क्षेत्राचा पगार ८ टक्क्यांवरून ९.७ टक्क्यांवर पोहोचला आहे. यावरून उत्पादन क्षेत्रात झपाट्यानं सुधारणा होत असल्याचं दिसून येते. मर्सरच्या इंडिया करिअर लीडर मानसी सिंघल यांनी भारतात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची परिस्थिती बदलत आहे. ही वेतनवाढ केवळ आर्थिक परिस्थितीचं द्योतक नाही, तर मनुष्यबळाचे नवे रूपही दर्शवत असल्याचं म्हटलं.
काय म्हणाल्या सिंघल?
७५ टक्क्यांहून अधिक कंपन्या आता कामगिरीवर आधारित वेतनरचनेचा अवलंब करत आहेत, असंही सिंघल यांनी सांगितलं. म्हणजेच आता कर्मचाऱ्याच्या कामगिरीच्या आधारे त्यांच्या पगारात वाढ होणार आहे. कंपन्या आता शॉर्ट आणि लाँग टर्म अशा दोन्ही प्रकारच्या कामगिरीचं मूल्यमापन करत आहेत. यामुळे बदल घडत आहेत. भविष्यात कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना अधिक चांगल्या पद्धतीनं प्रेरित करणं आणि त्यांच्या मेहनतीनुसार वेतन देणं आवश्यक ठरेल, असंही यातून सूचित होत आहे.. ही वेतनवाढ भारतीय उद्योगातील बदलाचं लक्षण असल्याचं सिंघल यांनी म्हटलं.