Russian missile strikes : सध्या २ व्यक्तींमुळे संपूर्ण जगात अशांतता पसरली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. पहिले म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. ज्यांनी टॅरिफ लादून व्यापारी युद्ध भडकवलं आहे. तर दुसरीकडे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन २ वर्षापासून युक्रेनच्या पाठीमागे लागले आहे. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी रशियाने युक्रेनवर आक्रमण केलं. तेव्हापासून आतापर्यंत दोन्ही देशांची अपरिमित हानी झाली आहे. आता तर रशियाने युक्रेन स्थित भारतीय कंपनीवर हल्ला केला. याचा फटका फक्त युक्रेनच नाही तर २८ देशांना बसला आहे.
१२ एप्रिल रोजी रशियाने युक्रेनमधील एका औषध गोदामावर क्षेपणास्त्र डागलं. हे गोदाम भारतातील आघाडीच्या औषध कंपनी कुसुम हेल्थकेअरचे असल्याचा युक्रेनचा दावा आहे. या हल्ल्याबाबत युक्रेनमधील भारतीय दूतावासाने म्हटले आहे की, भारताशी विशेष मैत्रीचा दावा करणारा रशिया जाणूनबुजून भारतीय औद्योगिक मालमत्तांना लक्ष्य करत आहे. या क्षेपणास्त्र हल्ल्यात मुले आणि वृद्धांसाठी आवश्यक असलेली औषधे नष्ट झाली.
कुसुम हेल्थकेअर काय आहे?
कुसुम हेल्थकेअर प्रा. लिमिटेड ही भारतातील एक प्रमुख औषध उत्पादक कंपनी आहे, जी पूर्णपणे निर्यात केंद्रित आहे. त्याची सुरुवात १९९७ मध्ये झाली असून तिचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. कंपनीचा पहिला उत्पादन प्रकल्प २००७ मध्ये राजस्थानमधील भिवाडी येथे स्थापन झाला. यानंतर, २०१८ मध्ये इंदूरमध्ये आणखी एक अत्याधुनिक स्वयंचलित प्लांट सुरू करण्यात आला.
२८ देशांमध्ये औषधांची निर्यात
कुसुम ग्रुपचे चार उत्पादन प्रकल्प आहेत - भारतात तीन (राजस्थान आणि मध्य प्रदेश) आणि युक्रेनमधील सुमी शहरात एक. कंपनीचे २ संचालक आहेत: बी.पी. गुप्ता (संस्थापक) आणि संजीव गुप्ता. कुसुम हेल्थकेअर युरोपियन युनियन, मेक्सिको, युक्रेन, मध्य पूर्व, आफ्रिका आणि दक्षिण आशियातील अनेक देशांसह २८ देशांमध्ये कार्यरत आहे. भारताव्यतिरिक्त, त्यात कंबोडिया, मलेशिया, सिंगापूर, व्हिएतनाम, थायलंड, म्यानमार, मंगोलिया, फिलीपिन्स आणि लाओस यांचा समावेश आहे.
वाचा - ..तर आयफोनसाठी खरच किडन्या विकाव्या लागतील? ३ लाखांपर्यंत जाणार किंमत? काय आहे कारण?
संशोधन आणि ब्रँड
कंपनीकडे २ आधुनिक संशोधन केंद्रे देखील आहेत. भारत, युक्रेन, मोल्दोव्हा, उझबेकिस्तान, कझाकस्तान, मेक्सिको, केनिया आणि इतर देशांमध्ये २००० हून अधिक व्यावसायिक काम करत आहेत. कुसुम हेल्थकेअरमध्ये १०० हून अधिक ब्रँड आहेत, जे स्त्रीरोग, हृदयरोग, न्यूरोलॉजी, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी सारख्या क्षेत्रात वापरले जातात. कुसुम हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडने ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात ४८८ कोटी रुपयांचा महसूल मिळवला. कंपनीचा चक्रवाढ वार्षिक वाढ दर (CAGR) गेल्या वर्षीच्या तुलनेत ४% आहे.