वॉशिंग्टन/नवी दिल्ली : भारतावर लावण्यात आलेल्या टॅरिफचा रशियाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असून, त्यांच्यावरील दबाव आपण आणखी वाढवणार आहोत, अशी धमकी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.
ट्रम्प यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यांची (रशियाची) अर्थव्यवस्था आता नीट चालेनाशी झालेली आहे. कारण, ती टॅरिफमुळे विस्कळीत झाली आहे. त्यांच्या दुसऱ्या मोठ्या तेल खरेदीदारास (भारतास) आम्ही सांगितले होते की, तुम्ही रशियाकडून तेल खरेदी थांबवा अन्यथा आम्ही ५० टक्के टॅरिफ लावू मात्र, त्यांनी ऐकले नाही आणि तेल खरेदी सुरूच ठेवली. त्यामुळे आम्ही ५० टक्के टॅरिफ लावले.
मी एवढ्यावरच थांबलेलो नाही
पुतीन यांच्या फोनसंदर्भात ट्रम्प यांनी सांगितले की, मी एवढ्यावरच थांबलेलो नाही. त्यापेक्षाही मोठ्या गोष्टी करण्याची पूर्ण तयारी मी केली होती. पण, मला त्यांचा (पुतीन) फोन आला की त्यांना भेटायचे आहे आणि मी त्यांना कशाबद्दल भेटायचे आहे, ते पाहणार आहे.
'नायरा एनर्जी' समोर नवे आव्हान
रशिया समर्थित भारतीय रिफायनरी 'नायरा एनर्जी' समोर एक नवीन आव्हान उभे ठाकले आहे. भारतातील सर्वात मोठी बैंक 'स्टेट बँक ऑफ इंडिया'ने (एसबीआय) 'नायरा एनर्जी'चे आंतरराष्ट्रीय व्यापार व विदेशी चलन व्यवहार पूर्ण करणे थांबविले आहे. अमेरिकेने लादलेल्या टॅरिफच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय एसबीआयने घेतला आहे.
भारत लावणार अमेरिकेवर टॅरिफ
अमेरिकेने भारताच्या अनेक उत्पादनांवर ५०% टॅरिफ लावले. याच्या प्रत्युत्तरात भारतही काही अमेरिकन उत्पादनांवर ५०% पर्यंत टॅरिफचा विचार करत आहे. जर असे झाले, तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावर भारताचा हा पहिला पलटवार असेल.
चीनला पुन्हा दिलासा
चीनवर लावण्यात आलेल्या अतिरिक्त टॅरिफ स्थगित करण्याच्या निर्णयास अमेरिकेने आणखी ३ महिन्यांची म्हणजेच १० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यासंबंधीच्या आदेशावर स्वाक्षरी केली.
लक्ष्मणरेषा ओलांडणार नाही
अमेरिकेसोबत वाटाघाटी करताना भारताने आपल्या हिताच्या रक्षणासाठी काही लक्ष्मणरेषा घालून घेतल्या असून, त्या ओलांडल्या जाणार नाहीत, अशी माहिती वाटाघाटीत सहभागी अधिकाऱ्यांनी सांसदीय समितीला दिली.