India Russia News: भारत आणि रशियामधील वाढती जवळीक पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. प्रथम, स्वस्त कच्चं तेल, नंतर एलएनजी पुरवठा वाढवण्याचा प्रस्ताव आणि आता रशियाची नवीन मेगा ऑफर... रशिया भारताला त्यांच्या धोरणात्मक कक्षेत अधिक घट्टपणे समाविष्ट करू इच्छित असल्याचं हे दर्शवत आहे. नव्या घडामोडींमध्ये, रशियानं भारताला जहाजबांधणी आणि बंदर पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठं सहकार्य देऊ केलं आहे. दरम्यान, अमेरिका या वाढत्या भागीदारीवर कशी प्रतिक्रिया देईल, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
रशियाची नवी मोठी ऑफर
अलीकडेच, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे विशेष सल्लागार आणि माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) निकोलाई पात्रुशेव यांनी भारताला भेट दिली. त्यांनी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांची भेट घेतली. बैठकीदरम्यान, रशियानं भारताला मासेमारी जहाजं, प्रवासी जहाजं आणि सहाय्यक जहाजांचं विद्यमान डिझाइन प्रदान करण्याचा तसंच भारताच्या गरजांनुसार नवीन डिझाइन विकसित करण्याचा प्रस्ताव मांडला.
SBI मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४१,८२६ चं फिक्स व्याज; परताव्याची गॅरंटी
विशेष जहाजांची ऑफर
रशियानं असंही म्हटलं की ते आइसब्रेकर आणि खोल समुद्रातील संशोधन जहाजं यासारख्या विशेष जहाजांच्या बांधकामात भारताला तांत्रिक सहाय्य देऊ शकते. आज सागरी क्षेत्रात भारताच्या सर्वोच्च प्राधान्यांपैकी असलेल्या हरित जहाजबांधणी आणि सागरी लॉजिस्टिक्समध्ये व्यापक सहकार्याबद्दल देखील चर्चा झाली.
आता बंदरांच्या पायाभूत सुविधांमध्ये सहकार्य
ही नवीन ऑफर रशियाचनं पहिल्यांदाच दिलेली नाही. यापूर्वी, रशियाने भारताला एलएनजी पुरवठा वाढवण्याची ऑफर दिली आहे. रशियाचे ऊर्जा मंत्री सर्गेई त्सिव्हिलेव्ह यांनी सांगितलं की भारताला त्यांच्या ऊर्जेच्या गरजांमध्ये गॅसचा वाटा १५% पर्यंत वाढवायचा आहे आणि रशिया त्यांच्या विद्यमान आणि आगामी प्रकल्पांमधून भारताला अधिक गॅस पुरवण्यास तयार आहे. शिवाय, रशिया भारताला स्वस्त कच्चं तेल पुरवत आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमधील ऊर्जा व्यापार सातत्यानं मजबूत होत आहे.
अमेरिकेची नाराजी?
भारताचे रशियासोबत वाढत्या व्यापारी संबंधांमुळे अमेरिका आधीच सावध आहे. रशिया-युक्रेन युद्धादरम्यान, अमेरिका उघडपणे रशियावर आर्थिक दबाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी असंही म्हटलंय की रशियाला आर्थिक मदत देणाऱ्या देशांना अतिरिक्त शुल्क आकारलं जाऊ शकतं. अशा परिस्थितीत, रशियाकडून मिळालेली ही नवीन ऑफर अमेरिकेसाठी अस्वस्थ करणारी असू शकते. परंतु, भारताची डिप्लोमसी नेहमीच संतुलित राहिली आहे. भारतानं दोन्ही महासत्तांशी संबंध राखण्याचा प्रयत्न केला आहे आणि धोरणात्मक हितसंबंधांना प्राधान्य दिलंय.
