अमेरिकेने भारताविरोधात मोठ्या प्रमाणात कर लादला आहे. रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे हा कर लादल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आता रशियाभारतासोबत अमेरिकेच्या कर विरोधात आहे.
'जर कोणत्याही देशात भारतीय उत्पादनांवर बंदी घातली जात असेल तर त्यांचे रशियन बाजारपेठेत स्वागत आहे, असे रशियाचे म्हणणे आहे.
भारतातील रशियन मिशनचे उपप्रमुख रोमन बाबुश्किन यांनी हे म्हटले आहे. अमेरिकेने अर्थव्यवस्थेचा वापर शस्त्र म्हणून केला आहे, पण मित्र कधीही निर्बंध लादत नाहीत हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. रशिया कधीही असे निर्बंध लादणार नाही, असंही ते म्हणाले. भारत आणि रशियाने कठीण काळात नेहमीच सहकार्य कायम ठेवले आहे. आम्ही भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा करत राहू आणि त्यासाठी एक यंत्रणा तयार केली आहे, असंही त्यांनी स्पष्ट केले.
पुतिन आणि मोदींची भेट होणार
रोमन बाबुश्किन म्हणाले की, शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट होईल. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते. व्लादिमीर पुतिन यांच्या भारत भेटीबद्दल त्यांनी सांगितले की, त्यांच्या तारखा निश्चित नाहीत. ते म्हणाले की, भारत आणि रशियामधील व्यापार वेगाने वाढत आहे आणि २०३० पर्यंत तो १०० अब्ज डॉलर्सच्या पुढे जाईल. याशिवाय, भारताला खते आणि तेल, वायू इत्यादी पुरवठा करण्यात रशिया पहिल्या क्रमांकावर आहे.
रशियन राजदूत म्हणाले की, अमेरिकेची रणनीती चुकीची आहे. ते उलटसुलट टीका करत आहेत. टॅरिफ वॉरमुळे डॉलरवरील विश्वास कमकुवत झाला आहे.
"रशिया भारतासोबतचा व्यापार असमतोल दूर करण्यासाठी पावले उचलेल. रशियाला भारतीय निर्यात वाढणे महत्त्वाचे आहे. आम्हाला भारतातून यंत्रसामग्री, औषध, चहा आणि तांदूळ यासारख्या वस्तूंची आयात वाढवायची आहे, असंही रशियन राजदूत म्हणाले. एवढेच नाही तर अमेरिकेने घेतलेला टॅरिफचा निर्णय चुकीचा आणि एकतर्फी असल्याचे त्यांनी सांगितले.
भारत रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवू शकतो का. यावर त्यांनी सांगितले की, मला असे वाटत नाही. त्यांनी सांगितले की, आम्ही भारताशी चर्चा करू आणि सर्व समस्या सोडवू.