Rupee fall impact : भारतीय रुपयाच्या वेगाने होत असलेल्या घसरणीमुळे सामान्य नागरिकांच्या खिशावरचा बोजा वाढणार आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाल्याचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन वापरातील वस्तूंवर होणार आहे, ज्यात मोबाईल फोन, टीव्ही, लॅपटॉप, एसी, फ्रीज, मेकअप उत्पादने आणि वाहनांचाही समावेश आहे. काही दिवसांपूर्वी सरकारने जीएसटी कमी केल्याने ग्राहकांना जो तात्पुरता दिलासा मिळाला होता, तो आता रुपयाच्या घसरणीमुळे कमी होताना दिसत आहे.
इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर सर्वाधिक परिणाम
- ज्या कंपन्या त्यांचे उत्पादन भाग किंवा संपूर्ण उत्पादन विदेशातून आयात करतात, त्यांना रुपयाची कमजोरी सर्वात मोठा त्रास देत आहे. कच्च्या मालाची वाढती किंमत आणि आता डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाल्यामुळे कंपन्यांना होणारे नुकसान भरून काढणे अशक्य झाले आहे.
- अहवालानुसार, मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही आणि मोठी घरगुती उपकरणे बनवणाऱ्या कंपन्यांनी डिसेंबर ते जानेवारी या काळात त्यांच्या किमतीत ३ ते ७ टक्क्यांनी वाढ करण्याची स्पष्ट भूमिका घेतली आहे.
- मेमरी चिप, तांबे आणि इतर आवश्यक भागांच्या किमती खूप वाढल्या आहेत. अनेक वस्तूंच्या उत्पादन खर्चाचा ३० ते ७० टक्के हिस्सा आयातीवर अवलंबून असल्याने, रुपयाची कमजोरी थेट उत्पादन खर्च वाढवत आहे.
- सुपर प्लास्ट्रोनिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अवनीत सिंग मारवाह यांनी सांगितले की, "जीएसटी कपातीचा जो फायदा मिळाला होता, तो संपूर्ण फायदा रुपयाची कमजोरी आणि सुट्या भागांच्या वाढलेल्या किमतींमुळे संपुष्टात येईल." त्यांनी हेही सांगितले की, मेमरी चिप्सचे दर चार महिन्यांत सहा पटीने वाढले आहेत.
कंपन्यांच्या योजना बदलल्या
- अनेक कंपन्यांनी रुपयाचा दर ८५ ते ८६ रुपये प्रति डॉलर इतका गृहीत धरून आपली योजना तयार केली होती, पण आता तो ९० रुपयांचा टप्पा ओलांडल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.
- हॅवेल्स : एलईडी टीव्हीवर सुमारे ३% दरवाढ.
- सुपर प्लास्ट्रोनिक्स: ७ ते १०% पर्यंत दरवाढ.
- गोदरेज ॲप्लायन्सेस : एसी आणि फ्रीजवर ५ ते ७% दरवाढ.
सौंदर्य उत्पादने आणि वाहनेही महागणार
इलेक्ट्रॉनिक्सनंतर सौंदर्य उत्पादनांचे क्षेत्रही प्रभावित होणार आहे. शिसेडो, एमएसी, बॉबी ब्राऊन, क्लीनिक आणि द बॉडी शॉपसारखे परदेशी ब्रँड्सची उत्पादने आधीच महाग होती आणि आता रुपयाच्या घसरणीमुळे ती अधिक महाग होतील.
वाचा - रशियातील सर्वात श्रीमंत महिला! मातृत्व रजेवर असताना सुचली कल्पना, आज अब्जावधींचं साम्राज्य
वाहन क्षेत्रालाही या धक्क्याचा सामना करावा लागणार
दुचाकी आणि लहान गाड्यांवर जीएसटी घटल्यामुळे विक्रीत ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये मोठी वाढ झाली होती, पण रुपयाची घसरण ही गती पुन्हा थांबवू शकते.
