एका इनव्हेस्टरनं सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे लक्झरी हॉटेलमधील सामान्य ऑमलेटच्या चढ्या किमतीवरून चर्चांना उधाण आलंय. गुंतवणूकदार किरण राजपूत यांनी गुरुवारी एक बिल शेअर केलं. त्यात ८०० रुपयांच्या ऑमलेटवर १८ टक्के जीएसटी आकारल्याचं दिसत होतं. २५ रुपयांचा पदार्थ ८०० रुपयांना का विकलं जात आहे? असा प्रश्न त्यांनी केला. या पोस्टवर लोकांकडून नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया आल्या. महागड्या हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सच्या किमतीवरून वाद सुरू झाला. काही लोक म्हणतात की ग्राहक अनुभव आणि त्या ठिकाणच्या वातावरणासाठी पैसे देतात. तर काहींच्या मते हॉटेल्स अधिक नफा कमावत आहेत.
किरण राजपूतच्या या पोस्टने सोशल मीडियावर लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. लक्झरी हॉटेलमधील प्लेन ऑमलेट ८०० रुपये + १८ टक्के जीएसटीवर का मिळते हे कोणाला माहित आहे का? साध्या ऑमलेटची किंमत २५ रुपयांपेक्षा जास्त नसावी, असं त्यांनी यासोबत लिहिलंय. यासोबतच त्यांनी बिलचा एक फोटोही शेअर केलाय. यावर अनंकांनी आपलं मत व्यक्त केलाय.
अनेकांनी दिल्या प्रतिक्रिया
काही लोकांनी लक्झरी हॉटेल्सच्या चढ्या किमतींचं समर्थन केलं. एका युजरनं लिहिलं की, "२५ रुपयांच्या ऑमलेट तुम्हाला अशा जागी मिळेल जिथे तुम्ही फोटो काढणार नाही, मित्रांना सांगणार नाही, एफबीवर पोस्ट करणार नाही आणि जो २५ रुपयांना देईल त्याच्याकडे तुमची काळजी घेण्यासाठी १०० लोकांचा स्टाफ किंवा डिनरनंतरचा स्विमिंग पूल नसेल."
आणखी एका नेटकऱ्यानं यावर प्रतिक्रिया देत त्याची किंमत इतकी आहे कारण काही लोक त्याचे पैसे द्यायला तयार आहेत, जर लोकं महागडं ऑमलेट घेण्यासाठी तयार असतील तर हॉटेल ते विकतीलच, असं म्हटलं.
टॅक्सचाही उल्लेख
काही लोकांनी कराचाही उल्लेख केला. हॉटेल्स रेस्टॉरंट सर्व्हिस कॅटेगरीमध्ये येतात, त्यामुळे त्यांच्यावर जीएसटी जास्त असतो. यापूर्वी सर्व्हिस टॅक्स ६ टक्के होता आणि राज्याचा लक्झरी टॅक्स वेगळा आकारला जात होता. आता पंचतारांकित हॉटेल्सवर २८ टक्के जीएसटी आकारला जातो, जो पूर्वीपेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे ऑमलेटच्या किमतीत कराचाही वाटा असतो.