Reliance Industries Crude Oil: मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज व्हेनेझुएलाचे तेल खरेदी करू शकते. रिलायन्स इंडस्ट्रीज जगातील सर्वात मोठे रिफायनिंग कॉम्प्लेक्स चालवते. कंपनीनं गुरुवारी सांगितलं की, जर बिगर-अमेरिकन खरेदीदारांसाठी विक्रीची परवानगी मिळाली, तर ती व्हेनेझुएलाचं कच्चं तेल खरेदी करण्यावर विचार करेल.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्रवक्त्याने रॉयटर्सला पाठवलेल्या ईमेलच्या उत्तरात म्हटलंय की, "आम्ही बिगर-अमेरिकन खरेदीदारांना व्हेनेझुएलाच्या तेलापर्यंत पोहोचण्याबाबत स्पष्टतेची वाट पाहत आहोत आणि नियमांचे पालन करून तेल खरेदी करण्याचा विचार करू." अमेरिकन सैन्यानं राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केल्यानंतर, या आठवड्यात व्हेनेझुएला आणि अमेरिकेदरम्यान, अमेरिकेला २ अब्ज डॉलर्सपर्यंतचं (सुमारे ३० ते ५० मिलियन बॅरल) कच्चं तेल निर्यात करण्याचा करार झाला आहे.
Crypto वर देखरेख ठेवणं कठीण! RBI नंतर आता आयकर विभागानंही हात वर केले, प्रकरण काय?
मार्चमध्ये थांबवली होती खरेदी
रिलायन्सनं मार्च २०२५ पासून व्हेनेझुएलाचं कच्चं तेल खरेदी करणं बंद केलं होतं. याचं कारण असे की, अमेरिकेनं या दक्षिण अमेरिकन देशातून कच्चं तेल खरेदी करणाऱ्या देशांवर २५% टॅरिफ जाहीर केला होता. कंपनीला व्हेनेझुएलाचे शेवटचं तेल मे महिन्यात मिळालं होतं. आता व्हेनेझुएलावर अमेरिकेचं नियंत्रण आल्यानं परिस्थिती बदलली आहे. आता व्हेनेझुएलाचे तेल अमेरिका विकणार आहे, कदाचित याच कारणामुळे रिलायन्सनं हे तेल खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केलीये.
व्हेनेझुएलाचं कच्चं तेल प्रक्रिया करण्याची क्षमता
- रिलायन्सच्या गुजरातमध्ये दोन रिफायनरी आहेत.
- या रिफायनरी दररोज सुमारे १.४ मिलियन बॅरल कच्च्या तेलावर प्रक्रिया करू शकतात.
- या प्लॅन्टच्या जटिल रचनेमुळे रिलायन्सच्या रिफायनरी व्हेनेझुएलाच्या घट्ट कच्च्या तेलावरही प्रक्रिया करण्यास सक्षम आहेत.
- हे रिलायन्ससाठी फायदेशीर आहे कारण अशा कच्च्या तेलाचा वापर करून ते उत्पादन खर्च कमी करू शकतात.
रशियन तेल खरेदीला लावला ब्रेक
रिलायन्स इंडस्ट्रीजनं रशियाकडून तेल खरेदी करणं जवळपास बंद केलं आहे. नुकतेच रिलायन्स इंडस्ट्रीजनं म्हटलंय की, जानेवारीमध्ये त्यांना रशियाकडून तेल मिळण्याची अपेक्षा नाही. गेल्या वर्षी रशियाकडून सर्वाधिक तेल खरेदी करणारी रिलायन्स ही पहिली भारतीय कंपनी होती.
रिलायन्स इंडस्ट्रीजनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' (X) वर एक निवेदन जाहीर केलंय. जामनगर रिफायनरीला गेल्या सुमारे तीन आठवड्यांपासून रशियाकडून कच्च्या तेलाचं कोणतंही जहाज मिळालेलं नाही आणि जानेवारीमध्येही रशियाकडून कच्च्या तेलाची कोणतीही डिलिव्हरी मिळण्याची अपेक्षा नाही. कंपनीने गेल्या आठवड्यात आलेला एक मीडिया रिपोर्टही चुकीचा असल्याचं म्हटलं. त्या रिपोर्टमध्ये रशियाकडून कच्च्या तेलानं भरलेली तीन जहाजं रिलायन्सच्या जामनगर रिफायनरीकडे येत असल्याचा दावा करण्यात आला होता.
