Rekha Jhunjhunwala : शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदाररेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमधील करूर वैश्य बँक या बँकेच्या शेअरने मंगळवारी बाजारात तुफान तेजी नोंदवली. बँकेने जाहीर केलेले दमदार तिमाही निकाल आणि एमडींच्या कार्यकाळ विस्ताराच्या वृत्तामुळे गुंतवणूकदारांनी या शेअरवर उड्या घेतल्या. व्यवहारादरम्यान हा शेअर १० टक्क्यांहून अधिक वाढून २९२ रुपयांच्या पातळीवर पोहोचला, तर बँकेने २९४.४५ रुपयांचा आपला ५२ आठवड्यांचा नवा उच्चांकही गाठला.
तिमाही निकालात नफ्याचा 'चौकार'
बँकेने डिसेंबर २०२५ च्या तिमाहीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. बँकेच्या नफ्यात ३९% ची मोठी वाढ झाली असून तो ६९० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कर्जातून मिळणाऱ्या उत्पन्नात १४.६२% वाढ होऊन ते १,२३९ कोटी रुपये झाले आहे. बँकेच्या एकूण कर्जांमध्ये १७% ची भरघोस वाढ झाली आहे.
बँकेची आर्थिक स्थिती मजबूत
बँकेची अनुत्पादित कर्जे म्हणजेच 'एनपीए' अत्यंत कमी झाले आहेत. सध्या बँकेचा ग्रॉस एनपीए केवळ ०.७१% असून तो ऐतिहासिक नीचांकावर आहे. तसेच बँकेचा भांडवल पर्याप्तता गुणोत्तर १६.०५% इतका मजबूत आहे, जो बँकेची जोखीम पेलण्याची क्षमता दर्शवतो.
बी. रमेश बाबू यांचा कार्यकाळ वाढणार
बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ बी. रमेश बाबू यांच्या नेतृत्वावर बोर्डाने पुन्हा एकदा विश्वास दर्शवला आहे. २९ जुलै २०२६ पासून पुढील दोन वर्षांसाठी त्यांच्या फेरनियुक्तीची शिफारस करण्यात आली आहे. या स्थिर नेतृत्वामुळे गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक संदेश गेला आहे.
वाचा - निर्मला सीतारमण यांचे 'सप्तर्षी'! अर्थसंकल्पाचा पाया रचणारे ७ दिग्गज अधिकारी कोण?
विदेशी गुंतवणूकदार आणि झुनझुनवालांचा विश्वास
परदेशी गुंतवणूकदारांनी आपली हिस्सेदारी १५.८०% वरून वाढवून १६.८७% केली आहे. डिसेंबर २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, रेखा झुनझुनवाला यांच्याकडे बँकेचे ४.०१ कोटी शेअर्स (४.१६% हिस्सा) आहेत.
