Sovereign Gold Bond :गुंतवणूकदारांसाठी सर्वात सुरक्षित आणि फायदेशीर मानल्या जाणाऱ्या 'सॉवरेन गोल्ड बाँड'ने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने 'SGB 2020-21 मालिका-IV' साठी मुदतपूर्व परतावा जाहीर केला असून, यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे नशीब फळफळले आहे. अवघ्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल १९० टक्क्यांची घसघशीत वाढ झाली आहे.
४,८०२ रुपयांचे झाले १३,९२९ रुपये!
जेव्हा ही मालिका २०२०-२१ मध्ये लॉन्च करण्यात आली होती, तेव्हा गुंतवणूकदारांनी एका युनिटसाठी (१ ग्रॅम सोने) फक्त ४,८०२ रुपये मोजले होते. आता मुदतपूर्व परताव्यासाठी आरबीआयने प्रति युनिट १३,९२९ रुपये किंमत निश्चित केली आहे. यामध्ये सुमारे १९० टक्के वाढ झाली असून गुंतवणूकदारांचा पैसा जवळपास ३ पटीने वाढला आहे.
व्याजाचा 'दुहेरी' फायदा
सॉवरेन गोल्ड बाँडचे वैशिष्ट्य म्हणजे गुंतवणूकदारांना केवळ सोन्याच्या वाढत्या किमतीचाच फायदा मिळत नाही, तर त्यावर वार्षिक २.५०% दराने व्याजही मिळते. म्हणजेच, गेल्या साडेपाच वर्षांत गुंतवणूकदारांनी भांडवली नफ्यासोबतच व्याजाच्या स्वरूपातही अतिरिक्त कमाई केली आहे.
किंमत कशी ठरवली जाते?
अनेक गुंतवणूकदारांना प्रश्न पडतो की आरबीआय ही किंमत कशी ठरवते? नियमानुसार,
मुदतपूर्व पैसे काढण्यासाठीची किंमत ही मागील तीन कामकाजाच्या दिवसांतील सोन्याच्या सरासरी बंद भावावर आधारित असते.
या मालिकेसाठी ९ जानेवारी, १२ जानेवारी आणि १३ जानेवारी २०२६ च्या सोन्याच्या दरांची सरासरी काढून १३,९२९ रुपये हा दर निश्चित करण्यात आला आहे.
वाचा - बिटकॉइनचा धमाका! ९६ हजार डॉलर्सचा टप्पा ओलांडून २ महिन्यांच्या उच्चांकावर; पुढे काय होईल?
मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा
सॉवरेन गोल्ड बाँडचा एकूण कालावधी ८ वर्षांचा असतो. मात्र, ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर सरकार गुंतवणूकदारांना मुदतपूर्व पैसे काढण्याची संधी देते. ज्या गुंतवणूकदारांना आपला नफा पदरात पाडून घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे.
