RBI repo rate home loan impact : भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्य कर्जदारांना सरत्या वर्षात मोठी भेट दिली आहे. रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉईंट्सची कपात करून तो आता ५.२५ टक्क्यांवर आणला आहे. २०२५ सालातील ही तिसरी कपात असून, वर्षभरात एकूण १२५ बेसिस पॉईंट्सची घट झाली आहे. यामुळे गृहकर्जदारांसाठी केवळ हप्ता कमी होण्याचीच संधी नाही, तर नियोजित पद्धतीने कर्ज फेडल्यास लाखोंची बचत करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे.
२५ बेसिस पॉईंट्सच्या कपातीचे गणित (५० लाखांचे कर्ज)
समजा तुम्ही ५० लाख रुपयांचे कर्ज २० वर्षांसाठी ७.५०% दराने घेतले आहे. आता हा दर ७.२५% झाल्यावर काय फरक पडेल, ते खालील तक्त्यावरून समजून घेऊ.
| तपशील | ७.५०% दराने | ७.२५% दराने (नवीन) | एकूण बचत |
| मासिक हप्ता | ४०,२८० रुपये | ३९,५२० रुपये | ७६० रुपये (दरमहा) |
| २० वर्षांतील एकूण व्याज | ४६.६७ लाख रुपये | ४४.८४ लाख रुपये | १.८ लाख रुपये |
हप्ता तेवढाच ठेवा, कालावधी कमी करा!
बहुतेक कर्जदार हप्ता कमी झाला की खुश होतात, पण अर्थतज्ज्ञांच्या मते खरा फायदा हप्ता न बदलण्यात आहे. जर तुम्ही दरमहा वाचलेले ७६० रुपये बँकेला हप्ता म्हणून देणं सुरूच ठेवलं, तर तुमच्या कर्जाचा कालावधी कमी होतो. अशा स्थितीत तुमची एकूण व्याजातील बचत १.८ लाखांवरून थेट ४ लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकते.
२०२५ सालातील एकूण कपातीचा 'मॅजिक' परिणाम
या संपूर्ण वर्षात ज्यांचे गृहकर्ज ८.५% वरून ७.२५% वर आले आहे, त्यांच्यासाठी ही मोठी पर्वणी आहे.
EMI मधील बचत : दरमहा सुमारे ३,८०० ते ३,९०० रुपये.
मुदत कमी केल्यास फायदा : जर हप्ता बदलला नाही, तर तुमच्या कर्जाची मुदत ३ वर्षांहून अधिक (४०-४५ महिने) कमी होऊ शकते आणि तुम्ही तब्बल १८ लाख रुपयांचे व्याज वाचवू शकता.
बँका कधी फायदा देणार?
रेपो रेटशी लिंक असलेल्या कर्जांचे दर ३० ते ६० दिवसांत बदलतात. मात्र, ज्यांचे कर्ज MCLR (मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेडिंग) शी जोडलेले आहे, त्यांना हा फायदा मिळायला पूर्ण एक तिमाही वाट पाहावी लागू शकते. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत आपले नवीन 'रिपेमेंट शेड्यूल' बँकेकडून नक्की तपासून घ्या.
रीफायनान्सिंगचा विचार करावा का?
जर तुमच्या सध्याच्या कर्जाचा दर बाजारातील नवीन दरापेक्षा ०.५०% (५० बेसिस पॉईंट्स) जास्त असेल, तर कर्ज दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करण्याचा विचार करा. प्रोसेसिंग फी भरूनही दीर्घकाळात तुमची मोठी बचत होईल.
वाचा - रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
कर्जदारांसाठी 'चेकलिस्ट'
- बँकेने रेट कटचा फायदा दिला आहे का, याची खात्री करा.
- शक्य असल्यास जुनाच हप्ता कायम ठेवून मुदत कमी करण्यासाठी बँकेला अर्ज द्या.
- 'फ्लोटिंग रेट'वर असणाऱ्यांनी दर तपासून घ्यावेत.
- बँक फायदा देण्यास टाळाटाळ करत असेल, तर कर्ज स्विच करा.
