RBI Repo Rate Cut News : गृहकर्जाचा डोंगर डोक्यावर असलेल्या आणि नवीन घर खरेदीचे स्वप्न पाहणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी आनंदाची बातमी आहे. डिसेंबर २०२५ मध्ये मिळालेल्या दिलासादायक निर्णयानंतर, आता फेब्रुवारी २०२६ मध्ये होणाऱ्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीत व्याजाचे दर पुन्हा एकदा कमी होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जाचे हप्ते आणखी कमी होऊन सर्वसामान्यांच्या मासिक बजेटला मोठी बचत मिळणार आहे.
फेब्रुवारीत २५ बेसिस पॉईंट्सची कपात?
'युनियन बँक ऑफ इंडिया'ने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार, रिझर्व्ह बँक फेब्रुवारी २०२६ च्या बैठकीत व्याजदर कपातीचे आपले धोरण सुरू ठेवू शकते. सध्या रेपो रेट ५.२५ टक्के इतका आहे. अहवालानुसार, यात २५ बेसिस पॉईंट्सची (०.२५%) कपात होऊ शकते. जर ही कपात झाली, तर रेपो रेट ५ टक्क्यांच्या ऐतिहासिक पातळीवर येईल.
महागाई नियंत्रणात आल्याचा परिणाम
आरबीआयने व्याजदर कपातीचा सपाटा लावण्यामागे महागाईचा दर मर्यादेत राहणे हे मुख्य कारण आहे. युनियन बँकेच्या विश्लेषणातून समोर आले आहे की, जर सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे वाढलेली सुमारे ०.५०% महागाई बाजूला ठेवली, तर मूळ महागाई दर अत्यंत कमी आहे. महागाईचा राक्षस आता नियंत्रणात असल्याने आरबीआयने विकासाला प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. फेब्रुवारीमध्ये सीपीआय आणि जीडीपीच्या 'बेस इयर'मध्ये बदल होणार आहे, जे आरबीआयच्या निर्णयासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.
२०२५: कर्जदारांसाठी दिलासादायक वर्ष
गेल्या वर्षभरात रिझर्व्ह बँकेने एकूण चार वेळा व्याजदरात कपात करून कर्जदारांना मोठी भेट दिली आहे.
- फेब्रुवारी २०२५ : ०.२५% कपात
- एप्रिल २०२५ : ०.२५% कपात
- जून २०२५ : ०.५०% ची मोठी कपात
- डिसेंबर २०२५ : ०.२५% कपात (रेपो रेट ५.२५% वर आला)
वाचा - कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
एफडी गुंतवणूकदारांची चिंता वाढणार?
एकीकडे कर्ज स्वस्त होत असताना, मुदत ठेवींवर अवलंबून असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी हा निर्णय चिंतेचा ठरू शकतो. रेपो रेट कमी झाल्यामुळे बँका त्यांच्या एफडीवरील व्याजदरातही कपात करतील, ज्यामुळे ठेवीदारांना मिळणारा परतावा कमी होईल.
