RBI MPC Policy Meeting Updates: भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज पतधोरण समितीच्या बैठकीतील निर्णयांची माहिती दिली. यावेळीही रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात (Repo Rate) ०.२५ टक्क्यांची कपात केल्याची घोषणा केली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज रेपो दरात बदल करत सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला. यावेळी २०२५ हे वर्ष आव्हानांनी भरलेलं असल्याचं म्हणत बँकिंग क्षेत्रात उत्तम काम झाल्याची माहिती मल्होत्रा यांनी दिली. दर कपातीनंकर आता रेपो दर ५.२५ टक्क्यांवर आला आहे
आज पतधोरण समितीच्या बैठकीनंतर रेपो रेट कमी (Repo Rate Cut) होऊन व्याज दर स्वस्त होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. महागाई घटली, जीडीपी वाढ वेगाने होत आहे आणि रुपया डॉलरविरुद्ध ९० च्या जवळ गेला आहे, या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय महत्त्वाचा मानला जात होता. गेल्या काही महिन्यांत आरबीआयनं रेपो दरात तीन टप्प्यांमध्ये एकूण १०० बेसिस पॉईंट्सनी कपात केली होती. या काळात किरकोळ महागाई सतत नियंत्रणात राहिल्यानं आरबीआयला हा निर्णय घेता आला. यावेळीही रिझर्व्ह बँकेनं सर्वसामान्यांना दिलासा देत रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात करुन तो ५.२५ टक्क्यांवर आणला.
काय म्हणाले गव्हर्नर?
Q1Fy27 मध्ये महागाई दरात कपात करण्यात आली आहे. तसंच आर्थिक वर्ष २०२६ मध्ये इन्कम टॅक्समधील बदलांमुळे वाढीला चालना मिळाल्याचं संजय मल्होत्रा म्हणाले. वाढीवा पाठिंबा देण्यासाठी रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. महागाईतही मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे आणि ती यापूर्वीच्या अंदाजापेक्षाही कमी राहण्याची अपेक्षा आहे. याशिवाय मॅन्युफॅक्चरिंग अॅक्टिव्हीटीमध्ये सातत्यानं सुधारणा होत असल्याचं ते यावेळी म्हणाले.
