Investment Strategies : जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक आणि 'ब्रिजवॉटर असोसिएट्स'चे संस्थापक रे डॅलिओ यांनी नुकतीच झेरोधाचे सह-संस्थापक निखिल कामत यांच्या 'WTF' पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. २००८ च्या जागतिक आर्थिक संकटाची अचूक भविष्यवाणी करणाऱ्या डॅलिओ यांनी या चर्चेत सोने, बिटकॉइन, पोर्टफोलिओ व्यवस्थापन आणि त्यांच्या १२ व्या वर्षांपासून सुरू झालेल्या रंजक प्रवासावर भाष्य केले.
६ डॉलर्सच्या कमाईपासून अब्जाधीश प्रवासापर्यंत
डॅलिओ यांनी सांगितले की, वयाच्या १२ व्या वर्षी त्यांनी गोल्फ कोर्सवर 'कॅडी' (खेळाडूंच्या बॅगा वाहून नेणारे) म्हणून कामाला सुरुवात केली होती. प्रति बॅग त्यांना ६ डॉलर्स मिळत असत. जेव्हा त्यांनी ५० डॉलर्स वाचवले, तेव्हा ते शेअर बाजारात गुंतवले. त्यांनी एका डबघाईला आलेल्या कंपनीचा ५ डॉलर्सपेक्षा कमी किमतीचा शेअर खरेदी केला. योगायोगाने त्या कंपनीचे अधिग्रहण झाले आणि शेअर्सची किंमत तिप्पट झाली. इथूनच त्यांना या 'शेअर बाजारा'ची गोडी लागली. गुंतवणूक शिकण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वतःचे नियम बनवणे, ते लिहून ठेवणे आणि भूतकाळात त्यांनी कशी कामगिरी केली असती, याचे परीक्षण करणे.
सोन्याचे महत्त्व : का आहे हा सर्वात सुरक्षित पर्याय?
सोन्याबद्दल बोलताना डॅलिओ यांनी अत्यंत महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले. त्यांच्या मते, सोने हे जगातील सर्वात स्वीकारार्ह 'चलन' आहे. इतर कोणत्याही चलनामागे सरकार किंवा संस्थेचे आश्वासन असते. मात्र, सोन्याचे मूल्य हे स्वतःमध्येच असते. ते छापले जाऊ शकत नाही किंवा पुरवठा हवा तसा वाढवता येत नाही. डॅलिओ म्हणतात की, कागदी चलनाला व्याजाचे आमिष असते, पण सोन्यावर व्याज मिळत नाही. तरीही, जेव्हा कागदी चलनाचे मूल्य कोसळते, तेव्हा सोनेच तारून नेते.
सोन्यात गुंतवणूक करण्याची 'योग्य वेळ' कोणती?
सोन्याचे भाव वाढलेले असताना आता गुंतवणूक करावी का? यावर डॅलिओ यांनी स्पष्ट उत्तर दिले. "मार्केट टाइमिंगचा विचार करणे सोडून द्या. प्रश्न हा नाही की सोन्याचा भाव वाढला आहे की कमी, तर प्रश्न हा आहे की तुमच्या पोर्टफोलिओमध्ये किती टक्के सोने असावे. हो, तुम्ही आजपासूनच सोन्यात गुंतवणूक सुरू करायला हवी." त्यांच्या मते, एका संतुलित पोर्टफोलिओमध्ये ५ ते १५ टक्के हिस्सा सोन्याचा असणे आवश्यक आहे. जरी सोने खूप मोठा परतावा देत नसले (वार्षिक सुमारे १.२% रियल रिटर्न), तरी इतर गुंतवणूक कोसळते तेव्हा सोने तुमच्या संपत्तीचे रक्षण करते.
वाचा - प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
बिटकॉइन की सोने? डॅलिओंचे मत
बिटकॉइनच्या मर्यादित पुरवठ्यामुळे त्याला 'डिजिटल गोल्ड' म्हटले जात असले, तरी डॅलिओ अजूनही सोन्यालाच पसंती देतात. बिटकॉइनचे व्यवहार सरकार ट्रॅक करू शकते आणि त्यात हस्तक्षेप करू शकते. याउलट सोन्यावर कोणाचेही नियंत्रण नसते. बिटकॉइनमध्ये तांत्रिक आणि सिस्टीमशी संबंधित धोके आहेत. डॅलिओ यांनी मान्य केले की त्यांच्याकडे अल्प प्रमाणात बिटकॉइन आहे, मात्र त्यांच्यासाठी सोन्याचे आकर्षण आजही सर्वाधिक आहे.
