मुंबई : दिवंगत उद्योगपती आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांच्या मालकीचा सेशेल्समधील व्हिला लवकरच विकला जाण्याची शक्यता आहे. सेशेल्समधील माहे बेटावरील समुद्रकिनाऱ्यावर असलेला हा व्हिला, एअरसेलचे संस्थापक सी. शिवशंकरन यांच्या कुटुंबाने तब्बल ६.२ मिलियन डॉलर (सुमारे ५५ कोटी रुपये) मध्ये खरेदी करण्यासाठी स्वारस्य दाखवले आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, स्वतंत्र मूल्यांकनकर्त्यांनी या व्हिलाची किंमत केवळ ८५ लाख रुपये एवढीच ठरवली होती. महत्वाचे म्हणजे, शिवशंकरन यांनीच रतन टाटा यांना हा व्हि ला खरेदी करण्यास मदत केली होती.
टाटा-शिवशंकरन यांची जुनी मैत्री -
शिवशंकरन आणि रतन टाटा यांची मैत्री सर्वपरिचित आहे. शिवशंकरन यांनी अनेकदा त्यांच्या मैत्रीचे किस्से सांगितले आहेत. मुंबईत टाटांच्या घरी सकाळच्या वेळी ते नियमितपणे ४५ मिनिटे भेटत असत. टाटांच्या जागतिक प्रतिमेमुळेच त्यांना सेशेल्समध्ये मालमत्ता खरेदी करण्याची विशेष परवानगी मिळाली होती, जिथे सामान्यतः केवळ नागरिकच जमीन खरेदी करू शकतात.
असे होणार विक्रीतून मिळालेल्या निधीचे वाटप -
जर हा व्हिला विकला गेला, तर विक्रीतून मिळालेली रक्कम रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशन आणि रतन टाटा एंडोमेंट ट्रस्ट यांच्यात समान वाटली जाईल. या संदर्भात १६ जून २०२५ रोजी बॉम्बे हाय कोर्टाने आदेश दिला आहे. महत्वाचे म्हणजे, सध्या शिवशंकरन यांच्याविरोधात सेशेल्स सुप्रीम कोर्टात दिवाळखोरीची कारवाई सुरू आहे. अशा स्थितीत हा व्यवहार कसा पूर्ण होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
