Tata Trust Row: दिग्गज औद्योगिक घराणं 'टाटा' (Tata) समूहाशी संबंधित असलेल्या एका ट्रस्टमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. टाटा ट्रस्ट्सच्या छत्राखाली कार्यरत असलेल्या एका 'एलाइड ट्रस्ट'मधील सदस्यांच्या नियुक्तीचं प्रकरण आता चॅरिटी कमिशनरपर्यंत पोहोचलंय. टाटा सन्सचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे निकटवर्तीय राहिलेले मेहली मिस्त्री यांनी 'बाई हीराबाई जमशेदजी टाटा नवसारी चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन'च्या (BHJTNCI) दोन दिग्गज विश्वस्तांच्या पात्रतेवर कायदेशीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. मिस्त्री यांनी वेणू श्रीनिवासन (TVS मोटरचे चेअरमन एमेरिटस) आणि विजय सिंह (माजी IAS अधिकारी) यांच्या सदस्यत्वावर आक्षेप घेत महाराष्ट्र चॅरिटी कमिशनरकडे तक्रार दाखल केली.
काय आहे हा 'एलाइड ट्रस्ट'?
सोप्या भाषेत सांगायचं तर, 'टाटा ट्रस्ट्स' ही एक मुख्य संस्था आहे, ज्याच्या अंतर्गत अनेक स्वतंत्र ट्रस्ट काम करतात. 'बाई हीराबाई ट्रस्ट' (BHJTNCI) हा सर रतन टाटा ट्रस्टशी जोडलेला एक सहयोगी म्हणजेच 'एलाइड ट्रस्ट' आहे. या ट्रस्टची स्थापना १९२३ मध्ये करण्यात आली होती. हा ट्रस्ट १९२३ पासून नवसारी (गुजरात) येथे शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात पारसी समुदायाची सेवा करत आहे.
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
वादाचे ५ मुख्य मुद्दे :
१. १०३ वर्ष जुन्या नियमांचा आधार :
मेहली मिस्त्री यांचा दावा आहे की, वेणू श्रीनिवासन आणि विजय सिंह हे या ट्रस्टचे विश्वस्त बनण्यास पात्र नाहीत. त्यांनी १९२३ च्या 'ट्रस्ट डीड'मधील कलम ६ आणि १८ चा हवाला दिला आहे. या नियमानुसार, जर एखादा विश्वस्त ठरवून दिलेल्या अटी पूर्ण करत नसेल, तर त्याला कायद्याने 'डीम्ड डेड' समजलं पाहिजे.
२. विश्वस्त पदासाठीच्या अटी :
मिस्त्री यांच्या युक्तिवादानुसार, ट्रस्टच्या नियमांनुसार विश्वस्त होण्यासाठी दोन अनिवार्य अटी आहेत :
- व्यक्ती 'पारसी जोरोस्ट्रियन' धर्माची असावी.
- ती व्यक्ती मुंबईची कायमस्वरूपी रहिवासी असावी.
मिस्त्री यांचं म्हणणं आहे की, श्रीनिवासन आणि विजय सिंह हे पारसी नाहीत आणि मुंबईचे कायमस्वरूपी रहिवासीही नाहीत, त्यामुळे त्यांची नियुक्ती सुरुवातीपासूनच बेकायदेशीर आहे.
३. 'विश्वासघाताचा' आरोप :
मिस्त्री यांनी हा मुद्दा अधिक गंभीर करत असे म्हटलंय की, पात्र नसतानाही या पदावर राहणं हे 'भारतीय न्याय संहिता' (BNS) २०२४ आणि 'महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट ॲक्ट' १९५० अंतर्गत फसवणूक आणि गुन्हेगारी विश्वासघातासारखं आहे. त्यांनी चॅरिटी कमिशनरकडे मागणी केली आहे की, सर्व विश्वस्तांकडून त्यांची पात्रता आणि धर्माची पुष्टी करणारं प्रतिज्ञापत्र मागवण्यात यावं.
४. ट्रस्टची सध्याची रचना :
सध्या या ट्रस्टच्या बोर्डामध्ये ६ दिग्गजांचा समावेश आहे:
- नोएल टाटा (अध्यक्ष)
- वेणू श्रीनिवासन (उपाध्यक्ष - ज्यांच्यावर आक्षेप आहे)
- विजय सिंह (उपाध्यक्ष - ज्यांच्यावर आक्षेप आहे)
- जिमी एन. टाटा
- दारियस खंबाटा
- जहांगीर एच.सी. जहांगीर
५. वारसा जपण्याचा उद्देश :
मेहली मिस्त्री यांनी स्पष्ट केलं की, हा लढा स्वतःचं पद परत मिळवण्यासाठी नाही. नोव्हेंबर २०२५ मध्ये त्यांनी स्वतःहून टाटा ट्रस्टच्या पदांचा राजीनामा दिला होता. त्यांचा उद्देश केवळ रतन टाटांचा वारसा, संस्थापकाची इच्छा आणि पारसी समुदायाच्या हिताचं रक्षण करणं हा आहे.
पुढे काय होणार?
मिस्त्री या प्रकरणात चॅरिटी कमिशनरनं सू मोटो घेऊन चौकशी करावी, अशी अपेक्षा करत आहेत. जर ही मागणी मान्य झाली, तर टाटा ट्रस्टच्या या दिग्गजांना आपली पात्रता सिद्ध करण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेतून जावं लागेल. १९२३ चे नियम २०२६ च्या या कॉर्पोरेट वादात काय वळण घेतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. याप्रकरणी वेणू श्रीनिवासन किंवा विजय सिंह यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
