Bajaj chetak : भारतात इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे. दिवसेंदिवस नवीन खेळाडू बाजारपेठेत उतरत आहे. अशा परिस्थितीत, बजाज ऑटोकडे दुर्लक्ष करता येणार नाही. कारण बजाजची इलेक्ट्रिक स्कूटर 'चेतक' ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक दुचाकी बनली आहे. तर पहिल्या क्रमांकावर नेहमीच वादात सापडणारी ओला इलेक्ट्रिक कंपनीची स्कूटर आहे. दरम्यान, या २ कंपन्यांमध्ये आता वाक्-युद्ध रंगण्याचं चिन्ह आहे. अलीकडेच, एका कार्यक्रमात ‘आऊटस्टँडिंग कंपनी ऑफ द इयर’ हा पुरस्कार मिळाल्यानंतर बजाज कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी 'ओला'ची खिल्ली उडवली आहे.
बजाज ऑटोला इंडिया बिझनेस लीडर अवॉर्ड्स (IBLA) 2024 समारंभात ‘आऊटस्टँडिंग कंपनी ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी कंपनीचे एमडी राजीव बजाज यांनी घोषणा केली की, डिसेंबरपर्यंत त्यांची इलेक्ट्रिक स्कूटर 'चेतक' भारतात सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक दुचाकी बनली आहे. ते म्हणाले, माझा मुलगा ऋषभ (जो गेल्या अडीच वर्षांपासून इलेक्ट्रिक चेतक टीमचा एक भाग आहे) याने आज सकाळी मला सांगितले की, डिसेंबरच्या वाहन नोंदणीच्या आकडेवारीनुसार, आमची इलेक्ट्रिक स्कूटर चेतक आता सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक स्कूटर बनली आहे. चेतकने तिसऱ्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर उडी मारली आहे.
ओला विरुद्ध शोला
यावेळी राजीव बजाज यांनी ओला इलेक्ट्रिकवर तोंडसुख घेतले. ते म्हणाले, “ओला ही ओला आहे, पण चेतक शोला आहे.” 'ओला इलेक्ट्रिक' कंपनीचा नोव्हेंबरपर्यंत सर्वात मोठा ईव्ही मार्केट शेअर होता. परंतु, टीव्हीएस मोटर कंपनी आणि बजाज ऑटोने ही तफावत कमी केली आहे. नोव्हेंबरमध्ये, ओला इलेक्ट्रिकने २७,७४६ नोंदणीसह २५.०९ टक्के मार्केट शेअर मिळवले. TVS २६,०३६ नोंदणीसह (२३.५५ टक्के) दुसऱ्या स्थानावर आहे आणि बजाज ऑटो २४,९७८ नोंदणीसह (२२.५९ टक्के) तिसऱ्या स्थानावर होता.
बजाज ऑटोचे ३ मोठे यश
राजीव बजाज यांनी आयबीएलए स्टेजवरून त्यांच्या कंपनीच्या ३ मुख्य यशांबद्दल सांगितले, ज्यात हायब्रीड बाइक निर्मिती, स्थानिक ते जागतिक प्रवास आणि ग्रीन एनर्जीच्या दिशेने कंपनीची पावले यांचा समावेश होता.
स्थानिक ते जागतिक ओळख : बजाज ऑटोने आता फक्त भारतातच नाही तर १०० हून अधिक देशांमध्ये आपली उत्पादने निर्यात करण्यास सुरुवात केली. म्हणूनच कंपनी स्वतःला “द वर्ल्ड्स फेवरेट इंडियन” म्हणते. कंपनीने जीवाश्म इंधनाकडून हरित ऊर्जेकडे जाण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्याची पहिली पायरी सीएनजी थ्री-व्हीलरसह होती, जी आता इलेक्ट्रिक टू आणि थ्री-व्हीलरपर्यंत पोहोचली आहे. अलीकडेच बजाजने जगातील पहिली सीएनजी दुचाकी 'बजाज फ्रीडम 125' लाँच केली आहे.