Prime Minister Internship Scheme: पंतप्रधान इंटर्नशिप योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील पायलटसाठी अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये देशातील ७३८ हून अधिक जिल्ह्यांमध्ये देशातील ३०० हून अधिक कंपन्यांकडून १,१९,००० हून अधिक इंटर्नशिप दिली जात आहे. २१ ते २४ वयोगटातील बेरोजगार युवक १२ मार्चपर्यंत या योजनेसाठी अर्ज करू शकतात. या फेरीत अर्जदार आपल्या पसंतीचा जिल्हा, राज्य आणि क्षेत्रानुसार शेवटच्या तारखेपर्यंत जास्तीत जास्त ३ इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात. म्हणजेच उमेदवाराला एक ऑफर आवडली नाही तर दुसऱ्यासाठी अर्ज करू शकते, दुसरीही ऑफर आवडली नाही तर तिसरा अर्ज करता येऊ शकतो.
कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, https://pminternship.mca.gov.in/ माध्यमातून ऑनलाइन अर्ज करावे लागतील. त्यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. केवळ असे तरुणच या योजनेचा लाभ घेऊ शकतात, जे पूर्णवेळ नोकरीत नाहीत किंवा कुठेही पूर्णवेळ शिक्षण घेत नाहीत. तसंच त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडे सरकारीनोकरी नसावी आणि कुटुंबातील कोणत्याही सदस्याचं वार्षिक उत्पन्न ४ लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं. कुटुंबातील सदस्यांमध्ये अर्जदार, अर्जदाराची पती/पत्नी आणि पालकांची गणना केली जाईल.
कुठे मिळणार संधी?
पंतप्रधान इंटर्नशीप योजनेच्या दुसऱ्या फेरीत इंधन, गॅस आणि एनर्जी, बँकिंग आणि वित्तीय सेवा, ट्रॅव्हल, ऑटोनॉटिक, मेटल्स अँड मायनिंग, मॅन्युफॅक्चरिंग, एफएमसीजी सह अनेक क्षेत्रातील कार्यरत असलेली आरआयएल, एचडीएफसी बँक, ओएनजीसी, आयशर मोटर्स, एनटीपीसी, मारुती सुझुकी आणि एल अँड टी सारख्या अनेक कंपन्या इंटर्नशिप देणार आहेत. दहावी उत्तीर्णांसाठी २४६९६, आयटीआय उत्तीर्णांसाठी २३६२९, पदविकाधारकांसाठी १८५८९, बारावी उत्तीर्णांसाठी १५१४२ आणि पदवीधरांसाठी ३६९०१ इंटर्नशिपच्या संधी आहेत.