नवी दिल्ली - मार्च २०२६पर्यंत देशातील एकूण २००पैकी ८०पेक्षा अधिक स्मार्टफोन मॉडेल्सच्या किमतीत सरासरी १५ टक्क्यांची वाढ झाली आहे. वाढती महागाई आणि सुट्या भागांच्या टंचाईमुळे हा फटका बसला असून, सुटे भाग महागल्यामुळे भारतीय बाजारपेठेतील स्मार्टफोनच्या किमतीनी नवा उच्चांक गाठला आहे.
‘काउंटरपॉइंट रिसर्च’ या संस्थेच्या आकडेवारीनुसार, १५ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या फोनची हिस्सेदारी ४१ वरून घसरून ३३ टक्क्यांवर आली आहे. स्वस्त फोन तयार करणाऱ्या कंपन्यांचा नफा अत्यंत कमी असतो, त्यामुळे सुट्या भागांच्या किमती वाढताच त्यांना फोनचे दर वाढवणे भाग पडले आहे.
किमतीत आणखी वाढ?
ग्राहकांसाठी चिंतेची बाब म्हणजे ही दरवाढ इथेच थांबणार नाही. दुसऱ्या तिमाहीत स्मार्टफोनच्या किमती पुन्हा एकदा १५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
नवीन मॉडेल्स जुन्या मॉडेल्सच्या तुलनेत ३० ते ४० टक्क्यांनी महाग असू शकतात. तंत्रज्ञान प्रगत होत असताना दुसरीकडे स्मार्टफोन खरेदी करणे आता सर्वसामान्यांसाठी स्वप्न ठरू लागले आहे.
